कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात मिंधे गटाचे महेश गायकवाड व विशाल पावशे यांनी बंडखोरी करत भाजपच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांची डोकेदुखी वाढवली आहे, तर महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार धनंजय बोडारे हे रिंगणात उतरले असून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेतील या चौरंगी लढतीत बोडारे प्रंटफूटवर आले आहेत. मिंधे आणि भाजपमधील या लाथाळ्यांमुळे बोडारे यांचे पारडे जड मानले जात आहे.
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी 2 फेब्रुवारी रोजी उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात मिंधे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यात सुदैवाने महेश गायकवाड बचावले असून या प्रकरणात अटक करण्यात आलेले गणपत गायकवाड तळोजा कारागृहात न्यायालयीन कस्टडीत आहेत. गायकवाड हे कारागृहात असल्याने भाजपने त्यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेले महेश गायकवाड यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर मिंधे गटाचे विशाल पावशे यांनीही बंडखोरी केली असून ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. याचा फटका सुलभा गायकवाड यांना बसण्याची शक्यता आहे.
उच्चशिक्षित बोडारेंना मतदारांची वाढती पसंती
उल्हासनगर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून येणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण पूर्वेचे उमेदवार धनंजय बोडारे हे इंजिनीयर असून शांत, संयमी तसेच कुणाच्याही सुखदु:खात धावून जाणारी व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे मतदारांची त्यांना पसंती असल्याचे सध्या दिसत आहे ही त्यांची जमेची बाजू आहे. श्रीमलंग ग्रामीण भागातही त्यांचा दांडगा संपर्क आहे. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसचे सचिन पोटे यांनी माघार घेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकदिलाने त्यांचा प्रचार करत आहेत. कल्याण पूर्वेत एकूण 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी यात बोडारे यांचेच पारडे जड असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.