केंद्राने आधी गुजरातच्या सफेद कांदा आणि आता दक्षिणेच्या बेंगलोर रोझ कांद्याच्या निर्यातीस परवानगी देत महाराष्ट्रावर अन्याय केला. यामुळे शिवसेना पक्ष व शेतकऱयांनी शुक्रवारी सकाळी लासलगावच्या खासगी बाजार समितीतील लिलाव रोखून पेंद्राविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निर्यातीवरील सर्व निर्बंध हटवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, अशा इशारा दिला.
केंद्राने एप्रिलअखेर गुजरात राज्यातील सफेद कांद्याची निर्यात खुली केली. मात्र, महाराष्ट्रात डिसेंबरपासून लादलेली निर्यातबंदी कायम ठेवल्याने संतापाची लाट उसळली. त्यानंतर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्यात खुली केली. मात्र, साडेपाचशे डॉलर प्रति मेट्रीक टन किमान निर्यातमूल्य व चाळीस टक्के अतिरिक्त निर्यातशुल्क लावून निर्यात होणारच नाही अशी तजबीज केली. काल गुरुवारी बेंगलोर रोझ कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय विदेश व्यापार महासंचालनालयाने घेतला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रावर अन्याय केला. या पार्श्वभूमीवर शिवसेना व कांदा उत्पादकांनी लासलगावच्या खासगी बाजार समितीत आंदोलन केले.