रेल्वेस्टेशन रोडवरील चौकात उभारण्यात आलेला शिवसेना स्तंभ हटविण्याचा मिंधे गटाचा डाव शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी पूर्णपणे उधळून लावला. मनपा प्रशासनाने शिवसेना स्तंभ हटविला जाणार नाही, असे आश्वासन देत आनंद दिघे यांचा स्तंभ उभारण्यासाठी आणण्यात आलेले बांधकाम साहित्य तातडीने हलविण्यास सुरुवात केली. दरम्यान, शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते शिवस्तंभ व शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.
पश्चिम विधानसभा मतदारसंघात मिंधे गटाला विजय मिळताच मस्तीत आलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनाकारण त्रास देण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाला हाताशी धरून रेल्वेस्टेशन रोडवरील चौकात शिवसेना शाखेच्या वतीने बांधण्यात आलेला शिवसेनेचा स्तंभ हटवून त्या ठिकाणी आनंद दिघे यांचा स्तंभ उभारण्याचा डाव आखण्यात आला आहे. त्यासाठी गोरगरिबांना दहा रुपयांत शिवभोजन देणारी हातगाडी अतिक्रमण म्हणून हटविण्यासाठी मनपाचे पथक देखील पाठविण्यात आले. पथकाने केवळ शिवभोजनसह दोन हातगाड्यावर कारवाई केली. मात्र, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेताच पथकातील अधिकाऱ्याने तातडीने हातगाडी सोडून दिली. त्यानंतर मात्र मिंधे गटाने आनंद दिघे यांचा स्तंभ उभारण्यासाठी मनपाला हाताशी धरून विटा, वाळू, कच हे बांधकाम साहित्य आणून ठेवले.
शिवसेना पदाधिकाऱ्यांना याबद्दलची माहिती मिळताच शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख राजू वैद्य, गिरजाराम हाळनोर, शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, पश्चिम विधानसभा प्रमुख राजू शिंदे, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, गोपाळ कुलकर्णी, प्रकाश कमलानी, गणेश लोखंडे, गोकुळ मलके, अॅड. धर्मराज दानवे, संजय हरणे, किरण गणोरे, संजय रिडलॉन, रणजीत दाभाडे, प्रल्हाद निमगावकर, चक्रनारायण कान्ह, महिला आघाडीच्या सहसंपर्कप्रमुख दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, मीना फसाटे, वैशाली आरट, सुनीता औताडे, सुकन्या भोसले, मीरा देशपांडे, भागूअक्का सिरसाट, सुचिता अंबेकर, अनिता लगट, लता शंकपाळ, रुपाली मुंदडा, सानिका शर्मा, अॅड. अंजना गवई, रोहिणी काळे, संध्या कोल्हे, मनीषा बिराजदार, रोहिणी पिंपळे, प्रतिभा राजपूत, पल्लवी काकुळते, दीपाली पाटील, प्राप्ती वैष्णव, मीना खोतकर, सुमित्रा डिकोंडवार, गायत्री चव्हाण आदीसह शिवसैनिक त्या ठिकाणी जमा झाले. मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सविता सोनवणे या देखील त्या ठिकाणी दाखल झाल्या. शिवसेना स्तंभ हटविण्यासाठी मनपाकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. त्या ठिकाणी आणून टाकण्यात आलेले बांधकाम साहित्य तातडीने उचलून घेण्याची कार्यवाही करण्यात आली.
शिवसेनेकडून स्तंभपूजन, ध्वजारोहण
रेल्वेस्टेशन रोडवरील चौकात असलेल्या शिवसेना स्तंभाचे पूजन आणि शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते करून ध्वजारोहण करण्यात आले. शिवसेना स्तंभ हटविण्याची कारवाई झाल्यास प्रशासनास शिवसेना सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या प्रसंगी देण्यात आला. जय भवानी, जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद, शिवसेनाप्रमुखांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.