अंबोली स्मशानभूमी बंद ठेवणाऱ्या महापालिकेला शिवसेनेचा दणका, तातडीने कार्यवाही करण्याची मागणी

मुंबई महानगरपालिकेने अंधेरी पश्चिम सीझर रोडवरील स्मशानभूमी 1 डिसेंबर 2024 पासून बंद ठेवल्यामुळे विभागात मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने शिवसेनेकडून याबाबत पालिकेकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज शिवसेनेने  स्मशानभूमीसमोरच जोरदार आंदोलन केले. पालिकेने या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

मागील तीन महिन्यांपासून बंद असलेल्या स्मशानभूमीमुळे स्थानिक रहिवाशांना अंत्यसंस्कारासाठी लांब अंतरावर जावे लागते. तसेच रुग्णवाहिका चालकांकडूनदेखील शव स्मशानभूमीमध्ये नेण्याकरिता अवास्तव दर आकारले जातात. त्यामुळे सर्वसामान्यांना मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर शिवसेना विभागप्रमुख अनिल परब यांच्या  मार्गदर्शनाखाली अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली उपविभागप्रमुख प्रसाद आयरे यांच्या पुढाकाराने स्मशानभूमीसमोर आज आंदोलन करून पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी विभाग संघटक अनिता बागवे, विधानसभा संघटक वीणा टॉक, सह संघटक ज्योत्स्ना दिघे, उपविभाग संघटक संजीवनी घोसाळकर, प्रणया सावंत, पूजा पाटील, शाखाप्रमुख दयानंद कड्डी, उदय महाले, सुधाकर आहिरे, दीपक सणस, एकनाथ केळकर, रेवती सुर्वे, छाया खानदेशी, मनाली पाटील, स्वाती  तावडे, मनोज  जाधव आदी उपस्थित होते.