महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यापासून परप्रांतीयांची मुजोरी वाढली आहे. गिरगाव, कल्याणची घटना ताजी असताना फोर्टमध्ये ‘डाबर’ कंपनीतील बिहारी अधिकाऱ्याच्या मराठी द्वेषाचा संतापजनक प्रकार शुक्रवारी समोर आला. ‘एक बिहारी सब पे भारी’ असे नेहमी ऐकवत बिहारी अधिकाऱ्याने मराठी कर्मचाऱ्याला नाहक मनस्ताप देणे सुरू ठेवले होते. या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने कंपनी गाठली आणि बिहारी अधिकाऱ्याला ‘शिवसेना स्टाईल’ दणका दिला. त्यानंतर शरण येत या मुजोर अधिकाऱ्याने माफी मागितली.
दक्षिण मुंबईत फोर्ट परिसरात ‘डाबर’ कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीत महेश पवार हे 19 वर्षांपासून काम करीत आहेत. कंपनीतील ‘सीनिअर लॉजिस्टिक मॅनेजर’ या वरिष्ठ पदावर नितीश कुमार हा बिहारी अधिकारी कार्यरत आहे. महेश पवार हे मराठी असल्याने नितीश कुमार पवार यांना सहा महिन्यांपासून मानसिक त्रास देत होता. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यापासून नितीश कुमारची मग्रुरी वाढली आणि त्याने ‘एक बिहारी सब पे भारी’ असे पवार यांना नेहमी ऐकवण्यास सुरुवात केली. वारंवारच्या मनस्तापामुळे पवार यांची तब्येतदेखील खालावली. बिहारी अधिकाऱ्याच्या मराठी द्वेषाला त्रस्त झालेल्या महेश पवार यांनी शिवसेना दक्षिण मुंबई कार्यालयात संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तातडीने ’डाबर’ कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली आणि मराठीद्वेष्ट्या नितीश कुमारची कडक शब्दांत कानउघाडणी दिली.
मराठी माणसांची गळचेपी कदापि सहन करणार नाही!
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ‘डाबर’ कंपनीच्या व्यवस्थापनाला लेखी निवेदनही दिले. महाराष्ट्रात मराठी माणसांना अशा प्रकारे त्रास देऊन त्यांची गळचेपी केली जात असेल तर कदापि सहन करणार नाही. महाराष्ट्रातील मराठी माणूस शांत बसणार नाही. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्ष सदैव लढत राहील, असा इशारा शिवसेना विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला.
शिवसेनेने दणका देताच मागितली माफी
मराठी कर्मचाऱ्याला दिलेल्या त्रासाची माहिती मिळताच शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्वरित कार्यालयाला भेट दिली. यावेळी कंपनी व्यवस्थापनाला तंबी देतानाच मराठीद्वेष्ट्या बिहारी अधिकाऱ्याला मराठी माणसांची माफी मागण्यास भाग पाडले. शिवसेनेने दणका देताच मस्तवाल अधिकाऱ्याचा ‘एक बिहारी, सब पे भारी’चा माज काही क्षणांत उतरला.