परप्रांतीयांकडून मराठी माणसावर हल्ले आणि अपमानाच्या घटना सुरूच असताना आज दक्षिण मुंबईतही एका सुशिक्षित उमेदवाराला केवळ मराठी असल्याचे सांगत कंपनी मालकाने नोकरी नाकारल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. याची गंभीर दखल घेत शिवसेनेने कंपनीवर धडक देत मालकाला चांगलेच धारेवर धरून जाब विचारला.
मरीन लाइन्स पूर्व लोहार चाळ येथे ही राध्येश्याम ब्रदर्स ही फॅब्रिक कंपनी आहे. येथे भरती असल्यामुळे दक्षिण मुंबईतील तरुण रूपेश विजय कुमार हा मुलाखतीसाठी गेला होता. यावेळी मुलाखतीदरम्यान केवळ मराठी असल्याचे सांगत त्याला नोकरी नाकारत असल्याचे मालकाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे तीन मराठी उमेदवारांचे बायोडाटा यावेळी नाकारून बाजूला ठेवण्यात आले. ‘मराठी माणसे इथे काम करू शकत नाही, मराठी माणसे इथे काम करण्यासाठी ‘सूट’ होत नाहीत,’ असे अवमानकारकरीत्या सांगण्यात आले. त्यामुळे धक्का बसलेल्या या तरुणाने थेट शिवसेना दक्षिण मुंबई मध्यवर्ती कार्यालयात धाव घेऊन त्याच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. याची गंभीर दखल घेत विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी कुलाबा विभाग अधिकारी विकास अडुळकर यांच्यासह कंपनीवर धडक देत कंपनीच्या मालकाला जाब विचारला. यावेळी मालकाने आपल्याला तसे म्हणायचे नव्हते, अनावधानाने बोललो असे सांगत दिलगिरी व्यक्त केली.
कंपनी मालक वरमला
मराठी माणसाच्या मुंबईमध्येच असा प्रकार घडत असेल तर कंपनीला शिवसेना स्टाईल दणका देण्यात येईल, असा इशारा यावेळी शिवसेनेकडून देण्यात आला. यानंतर हादरलेल्या पंपनी मालकाने यापुढे मराठी तरुणांना नोकरीमध्ये प्राधान्य देऊ, असे आश्वासन दिल्याने त्याला समज देऊन सोडण्यात आले.