भररस्त्यात चुलीवर भाकरी थापत सरकारविरोधात संताप, गॅस दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक

एकीकडे लाडक्या बहिणीसाठी आपण काहीतरी वेगळे करतो आहोत, हे दाखवायचे आणि गॅस दरवाढीतून गोरगरिबांना लुटायचे. हा नवा धंदा राबविणाऱ्या केंद्र व राज्यातील भाजपा सरकारविरोधात प्रचंड संताप आहे. याविरोधात शिवसेनेच्या वतीने पुणे, सांगलीत भररस्त्यात चुली पेटवून त्यावर भाकरी थापत केंद्र व राज्यातील सरकारचा निषेध करण्यात आला.

‘अब की बार महागाई सरकार, महागाईचा झटका लाडक्या बहिणींना फटका,’ अशा जोरदार घोषणा देत पुण्यात कसबा पेठेत शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसैनिक महिलांनी रस्त्यावरच चूल पेटवून त्यावर भाकरी थापल्या. गॅस दरवाढीविरोधात शिवसैनिकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. यावेळी आंदोलनाला गजानन थरकुडे, रामभाऊ पारीख, उपशहर प्रमुख आबा निकम, उमेश वाघ, शहर संघटक राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, मकरंद पेठकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, निवडणूक समन्वयक निकिता मारटकर, विद्या होडे, विभागप्रमुख मुकुंद चव्हाण, चंदन साळुंके यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना सांगली जिह्याच्या वतीने केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबरोबरच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना महिला आघाडीने सिलिंडर हातात घेऊन निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर रस्त्यावर चुली मांडून त्यावर भाकरी थापत केंद्र व राज्य सरकारचा जोरदार निषेध केला. एकीकडे लाडक्या बहिणीला पैशाचे गाजर दाखवून दुसऱ्या बाजूने तिची लुटमार करण्याचा हा धंदा आहे, असा हल्लाबोल महिला आघाडीने केला. यावेळी आंदोलकांच्या हाती ‘लाडक्या बहिणींना भावांकडून गॅस दरवाढीची भेट’, असे फलक घेण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, महिला आघाडीच्या सुजाता इंगळे, शहरप्रमुख रुपेश मोकाशी, विराज बुटाले यांनी केले.

गॅस सिलिंडरची महाराणी गेली कुठे?

महागाईची झळ आज गोरगरीब, सामान्य माणसाच्या चुलीपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे एकेकाळी 10 रुपये गॅस वाढला की केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर बसणारी भाजप नेता स्मृती इराणी यांचे आंदोलनाचे पोस्टर या ठिकाणी लावण्यात आले होते. भाजपची इराणी तुझी स्मृती गेली कुठे? सिलिंडरची महाराणी गेली कुठे, असा प्रश्न आंदोलकांनी यावेळी विचारला.