महाराष्ट्राच्या एसटी चालकाला कन्नडिगांनी काळं फासल्याने संताप, शिवसेनेने कोल्हापूरात कर्नाटकच्या बस रोखल्या; बसवर बांधले भगवे झेंडे

कन्नड भाषा येत नसल्याने, कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी शुक्रवारी रात्री चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य एसटी बस चालकाला धक्काबुक्की करून, तोंडाला काळे फासल्याचा निंदनीय प्रकार घडला. याचे संतप्त पडसाद आज कोल्हापुरात उमटले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवसैनिकांनी मध्यवर्ती बसस्थानक समोर कर्नाटक परिवहनच्या बस अडवून, कर्नाटक सरकार आणि करवेच्या गुंडांचा तीव्र निषेध केला. तसेच कर्नाटकच्या बसवर भगवा झेंडा फडकवला.

गेल्या 68 वर्षांपासून महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडणाऱ्या कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवरील कानडी अत्याचाराचे सत्र अजुनही थांबलेले नाही. कन्नडची सक्ती आणि कन्नड रक्षक वेदिका या कानडी संघटने कडून मराठी भाषिकांवरील होणारे हल्ले कर्नाटक सरकारच्या वरदहस्तानेच सुरू असल्याचे अजूनही पहावयास मिळत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बंगळुरू मुंबई ही एसटी चालक भास्कर जाधव चित्रदुर्ग येथून कोल्हापूरच्या दिशेने येत होते.यावेळी रात्री उशिरा कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी अचानक एसटी अडवून,चालकाकडे कन्नड येते का अशी विचारणा करून,कन्नड येत नसल्याचे समजताच चालकास थेट एसटीतून खाली उतरवुन तोंडाला काळे फासले.तसेच एसटीलाही काळे फासले.यावेळी मराठीचा अवमान करणाऱ्या घोषणा देत,जर कन्नड येत नसेल तर कर्नाटकात येऊ देणार नसल्याच्या धमक्या ही देण्यात आल्या. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.रात्री उशिरा याची माहिती मिळताच, महाराष्ट्रातून एसटी अधिकारी चित्रदुर्गच्या दिशेने रवाना झाले.या घटनेमुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून,जर सीमाभागात प्रवास करताना सुरक्षा मिळाली नाही तर आम्ही कर्नाटकात गाड्या घेऊन जाणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

दरम्यान आज सकाळी शिवसेना कोल्हापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मध्यवर्ती बसस्थानकासमोर कर्नाटक परिवहनच्या बस अडवून,कर्नाटक सरकार आणि करवेच्या गुंडांचा तीव्र निषेध केला.यावेळी बसवर भगवा ध्वज फडकविला.पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन नंतर सोडले.यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

महाराष्ट्राचे मंत्री गप्पच; हा सुद्धा अवमानच – उपनेते संजय पवार

मराठी द्वेषातून करवेच्या गुंडांनी महाराष्ट्राच्या एसटी बसचालकाला आणि एसटीला काळे फासण्याचा नीचपणा केला आहे. मराठी भाषिकांना जाणीवपूर्वक डिवचण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यापुढेही मराठी भाषिकांसाठी सदैव लढत राहतील अशी ग्वाही शिवसेना उपनेते संजय पवार यांनी दिली. दरम्यान या गंभीर घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचे मंत्री सुद्धा गप्पच राहतात, हे मराठी भाषिकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यामुळे करवेच्या गुंडांनी जरी एसटी चालक आणि एसटीला काळे फासले असले तरी तो आपल्या मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचा अवमान म्हणावा लागेल, असे संजय पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या बस बंद कराव्यात – विजय देवणे

महाराष्ट्राच्या एसटी बसच्या चालकाच्या तोंडाला काळे फासण्याचा नामर्दपणा हा करवेच्या गुंडांनी केलेला आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब महाराष्ट्रात फिरणाऱ्या कर्नाटकच्या बस बंद कराव्यात.तसेच कर्नाटक सरकार जोपर्यंत मराठी माणसांची माफी मागत नाहीत,तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करत,त्यांनी जरी तोंडाला काळे फासले असले तरी आम्ही मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे प्रतिक व मराठी भाषिकांचा अस्मिता असलेला फगवा झेंडाच बसवर फडकवत असल्याचे विजय देवणे यांनी सांगितले.