मुलुंडमध्ये धारावीकरांचे पुनर्वसन होऊ देणार नाही, शिवसेनेचा सरकारविरोधात धडक मोर्चा

धारावीचा पुनर्विकास अदानी करत असून धारावीतील 4 लाख प्रकल्पग्रस्तांचे मुलुंडमधील मिठागराच्या जमिनींवर पुनर्वसन केले जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाला मुलुंडकरांचा तीव्र विरोध असून मुलुंडकरांच्या मागे खंबीरपणे उभे ठाकत ईशान्य मुंबई शिवसेनेने आज धडक मोर्चा काढला. यावेळी सरकारचा हा डाव शिवसेना हाणून पाडेल, असा इशारा आमदार सुनील राऊत यांनी दिला.

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अदानी समूहाने मुंबईतील मोक्याच्या सुमारे 20 भूखंडांची मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. त्यात मुलुंडमधील मिठागरांची 58 एकर, मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची 46 एकर आणि मुलुंड जकात नाक्याच्या 10 एकर अशा एकूण 114 एकर जागेचा समावेश आहे. त्यापैकी मिठागरांची 58 एकरची जागा 319 कोटी रुपये देऊन अदानीने ताब्यात घेतली आहे. उर्वरित दोन भूखंडही लवकरच ताब्यात घेतले जाणार आहेत. मात्र, धारावीकरांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन केले तर मुलुंडवासीयांच्या पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येऊन संघर्ष निर्माण होईल, अशी भूमिका घेत राज्य सरकारच्या निर्णयाला मुलुंडवासीयांनी जोरदार विरोध केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ईशान्य मुंबई विभागाच्यावतीने आज मुलुंडमध्ये धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने स्थानिक मुलुंडकरही सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना खासदार संजय दिना पाटील, आमदार सुनील राऊत, उपनेते दत्ता दळवी, विभागप्रमुख सुरेश पाटील, रमेश कोरगावकर, महिला विभाग संघटक राजराजेश्वरी रेडकर, मुलुंड उपविभाग प्रमुख नितीन चौरे, दिनेश जाधव, माजी नगरसेवक उमेश माने, शाखाप्रमुख अमोल संसारे, महिला आघाडीसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

अदानीला धारावीकरांसह मुंबईकरांचाही ठाम विरोध

अदानी समूहाकडून आधी धारावीकरांचे पुनर्वसन धारावीमध्ये केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, हे आश्वासन अदानी समूहाने पाळले नाही. धारावीकरांना अंधारात ठेवून, हा मोक्याचा भूखंड बळकावून धारावीकरांचे मुंबईच्या विविध भागात पुनर्वसन करण्याची व्यूव्हरचना केली जात आहे. त्यासाठी राज्य सरकार, मुंबई महापालिका, कलेक्टर लॅण्डच्या मालकीच्या जागा ताब्यात घेतल्या जात आहेत. त्यामुळे अदानी समूहाच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला धारावीकरांसह मुंबईकरांचा ठाम विरोध आहे.

…तर प्रत्येक शिवसैनिक रस्त्यावर उतरेल!

धारावीकरांना धारावीमधून बाहेर जाऊन देणार नाही, ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे.धारावीकरांनाही धारावीच्या बाहेर जायचे नाही. मुलुंडमध्येही नागरी वस्ती मोठय़ा प्रमाणात असून त्यांनाही धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये नको आहे. त्यामुळे आम्हीही मुलुंडमध्ये धारावीकरांचे पुनर्वसन राज्य सरकारला करून देणार नाही. त्यासाठी प्रत्येक शिवसैनिक रस्त्यावर उतरेल. प्रसंगी रस्त्यावर रक्त सांडले तरी शिवसैनिक त्यासाठी तयार असेल, असा इशारा आमदार सुनील राऊत यांनी यावेळी सरकारला दिला.