शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आक्रमक रूप आज शिवसैनिकांनी पाहिले. खोटय़ा केसेसमध्ये फसवू पाहणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे अक्षरशः तुटून पडले. ‘आता एक तर तू राहशील किंवा मी’ असा निर्वाणीचा इशाराच त्यांनी दिला. लोकसभेत इंगा दाखवला आता विधानसभेतही दाखवू असे सांगतानाच, शिवसैनिकांनो! आदेशाची वाट पाहू नका, विधानसभेच्या कामाला लागा आणि कुणी शिवसेनेच्या वाटय़ाला गेला तर सोडू नका, असे उद्धव ठाकरे गरजले.
शिवसेनेचा मुंबई पदाधिकारी मेळावा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात झाला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. ‘फडणवीस यांनी मला आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात डांबण्याचा डाव रचला होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला ही गोष्ट सांगितली होती. यापुढे मात्र गप्प राहायचे नाही, आता तुटून पडायचे,’ असे उद्धव ठाकरे म्हणताच रंगशारदा सभागृह ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणांनी दुमदुमले.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि शिवसेनेला मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दलही उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाष्य केले. शिवसैनिकांच्या अथक मेहनतीमुळे हे यश मिळाले, असे ते म्हणाले. लोकसभेत आणखी मोठय़ा विजयाची अपेक्षा होती. निवडणुकीच्या निकालानंतर देशातील अनेक मोठय़ा नेत्यांनी संवाद साधला आणि महाविकास आघाडी व शिवसेनेने देशाला नवी दिशा दाखवल्याची प्रतिक्रिया दिली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मशालीशी साधर्म्य असलेली चिन्हे मतपत्रिकेवर नकोत
चोर लोकांनी ग्रामीण भागात धनुष्यबाण आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावल्याने लोकसभा निवडणुकीत अनेक जणांनी चुकून बो अॅण्ड अॅरोला मते दिली होती. काही अमराठी लोकांनी आपल्याला ही माहिती दिली. विधानसभेत तसे होऊ नये म्हणून शिवसेनेने निवडणूक आयोगाला स्वतः मशालीचे चिन्ह बनवून दिले आहे. पूर्वी धनुष्यबाणाचे चित्र बनवून शिवसेनेने दिले होते आणि त्याला आयोगाने शिवसेनेची निवडणूक निशाणी म्हणून मान्यता दिली होती. तशीच मान्यता आता दिलेल्या मशालीच्या चित्रालाही मिळावी आणि मशालीशी साधर्म्य असणाऱ्या निशाणी मतपत्रिकेवर ठेवू नका, अशी विनंती आयोगाला केली आहे, अशी माहिती यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिली. आमदार अपात्रतेप्रमाणे त्याचाही निकाल कदाचित साठ-पासष्ट वर्षांत लागेल, असा टोला त्यांनी लगावला व आपली मशाल महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचली पाहिजे, असे आवाहन केले. अजूनही अनेक शिवसेना शाखांच्या बोर्डावर धनुष्यबाण निशाणी दिसतेय, त्याजागी मशाल लावा, असेही ते म्हणाले.
शंकराचार्य मध्यंतरी ‘मातोश्री’ निवासस्थानी येऊन गेले. विश्वासघात हा सर्वात मोठा घात आहे आणि विश्वासघात करणारा हिंदू असूच शकत नाही, असे ते म्हणाले होते याचाही उल्लेख उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
जायचे तर उघड जा, पण आत राहून दगाबाजी करू नका
हा शिवसेनेतून गेला, तो गेला असे पह्न सध्या अनेकांना येत असतील. पण कुणी पैसे देताहेत म्हणून आईशी गद्दारी करू नका, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले. ज्यांना जायचे असेल त्यांनी आत्ताच जा, पण आत राहून दगाबाजी करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले. तरीही नगरसेवक, माजी नगरसेवक ज्यांना जायचेय त्यांनी जा, एकतर तुम्ही रहा किंवा मी राहीन अशा ईर्षेनेच मी मैदानात उतरलोय. माझ्यासोबत राहतील ते माझे आणि समोर राहतील ते माझे शत्रू. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या शिवसैनिकांना घेऊन मी जिंपून दाखवीन, असे उद्धव ठाकरे यांनी छातीठोकपणे सांगितले.
पुन्हा सत्ता आणल्याशिवाय राहणार नाही
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या नाकावर टिच्चून स्वराज्य स्थापन करून दाखवले. गड, किल्ले, स्वराज्य असे सर्व गेले होते. तरीही महाराजांनी पुन्हा उभे केले. त्याच महाराजांकडून स्फुर्ती घेऊन आम्ही उभे राहिलोय. शिवसेनेचे सर्वकाही हिरावून घेतलात तरी पुन्हा सत्ता आणून दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे खुले आव्हानच उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजप आणि मिंध्यांना दिले.
मराठी माणसाला रोखणाऱयांना गुजरातला हाकलून द्या
मुंबई, महाराष्ट्रातील नोकऱयांमध्ये मराठी माणसाची गळचेपी करणाऱयांवरही उद्धव ठाकरे यांनी यावेळी आसूड ओढला. ‘हे व्यापारी आपल्यात फूट पाडत आहेत. त्यांच्या खाण्याला काही मर्यादा आहे की नाही? मराठी माणसांना प्रवेश नाही म्हणतात? असे कुणी म्हणाले तर त्यांना गेटआऊट म्हणून गुजरातला हाकलून द्या, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना सांगितले. धनाढय़ व चोऱयामाऱया करणारे पुन्हा मतदार नोंदणी करत आहेत. त्यामुळे यावेळी झोपून राहिलो तर मुंबई उपऱयांच्या हातात जाईल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
बाळासाहेबांनी शिवसेना का स्थापन केली?
संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाल्यानंतर बाळासाहेबांनी शिवसेना का स्थापन केली? कारण यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की मुंबई महाराष्ट्रात आहे, पण महाराष्ट्र मुंबईत नाही. मुंबईतला मराठी माणूस बाहेर जातोय. त्यांच्यावर अन्याय होतोय… अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.
भाजप चोर व राजकीय षंढांचा पक्ष
भाजप हा चोर व राजकीय षंढांचा पक्ष आहे. भाजपचे मनसुबे राज्याला भिकारी बनवणारे आहेत, अशी चपराक लगावतानाच, मुंबईला ओरबाडले जात असताना मी शांत बसू शकत नाही. शिवसेना एक तळपती तलवार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
रंगशारदा सभागृहात बुधवारी मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱयांच्या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, आमदार अॅड. अनिल परब, उपनेते विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, पराग डाके, अमोल कीर्तिकर, शिवसेना व युवासेना सचिव वरुण सरदेसाई, साईनाथ दुर्गे, आमदार मिलिंद नार्वेकर, ज. मो. अभ्यंकर, सुप्रदा फातर्पेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
मला माझे शिवसेना नाव पाहिजे आणि ते मिळणार
सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेची याचिका प्रलंबित आहे. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तो निकाल पाच-पंचवीस वर्षांत लागेल अशी आशा मी कालच व्यक्त केली होती. तो पाच दिवसांत, पाच वर्षांत, पन्नास वर्षांत लागेल… नक्कीच लागेल. शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयावर श्रद्धा आणि विश्वास आहे. मला माझे शिवसेना नाव पाहिजे आणि ते मला मिळणार, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. निकाल लागेल तेव्हा लागेल पण आता मशालीचा प्रचार जोरदार करा, असे आवाहन त्यांनी केले.
विधानसभेसाठी ‘घर घर दस्तक’ द्या!
कोरोना काळात शिवसेनेने कुणी आजारी आहेत का, कुणाला उपचार हवे आहेत का हे पाहण्यासाठी ‘घर घर दस्तक’ मोहीम राबवली होती. तसेच काम आपण मतदार यादीसाठी करू शकतो. जे काम पक्षप्रमुख, शाखाप्रमुख करू शकत नाही ते गटप्रमुख करू शकतो. गटप्रमुखाने त्यांच्या विधानसभा क्षेत्रनिहाय मतदार याद्या बनवल्या आणि त्यानुसार शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान मिळवून दिले तर आपण निश्चितच जिंकू शकतो, असे आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.
मुंबई माझ्या हक्काची आहे, पण मुंबईत मराठी माणसाला उपरे ठरवणाऱया दोन व्यापाऱयांची अवलाद केंद्रात बसली आहे. त्या व्यापारी वृत्तीला आपल्याला चिरडायचे आहे. तोडा, फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती मोदी आणि शहा हे व्यापारी मुंबईत वापरून राज्य जिंकायला बघताहेत.
मुंबई अस्तित्वाची लढाई लढतेय. मुंबईत कंत्राटदार माझा लाडका, अदानी माझा लाडका योजना सुरू आहेत. सर्वत्र पाणी तुंबतेय. धारावीकरांना शहराबाहेर घालवण्याचा घाट घातला गेला आहे. आरेची जमीन मुंबई बँकेच्या घशात घातली जात आहे. पण बुटचाटे लाचार मिंधे खुर्चीसाठी आईच्या कुशीवर वार करत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर धारावीचे टेंडर आणि महापालिकेचा पैसा ओरबाडणारी एमएमआरडीए बंद करणारच!
उत्सवांमधून मिंध्यांची गद्दारी जगासमोर आणा!
शिवसेनेबरोबर झालेली गद्दारी दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा उत्सवांच्या माध्यमातून जगासमोर आणा. उत्सव मंडळांच्या माध्यमातून ते काम करा, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. गणेशोत्सवातील देखाव्यांमधून गद्दारीचा उल्लेख करायला काहीच हरकत नाही, असे त्यांनी सांगितले.
विधानसभेत मोदींची उरलीसुरली गुर्मीही उतरवतो
लोकसभा निवडणुकीत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असा नडलो की त्यांना घामच फुटला, आता त्यांचे भाषण पाहताना कीव येते, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. त्यांनी इतकी वर्षे अंडी उबवली काय, असा संतप्त सवालही त्यांनी केला. आम्ही असेच आहोत, वाकडय़ात गेलो की तोडून टाकतो, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. पंतप्रधान मोदींनी आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराला यावे, तेव्हा त्यांची उरलीसुरली गुर्मीही उतरवून टाकू, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.