बाबासाहेबांच्या पुतळ्यातील त्रुटी तातडीने दूर करा! शिवसेनेची सरकारकडे मागणी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथे उभे राहत असलेल्या जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी बनवण्यात आलेल्या प्रतिकृती पुतळ्यात अनेक त्रुटी असून या त्रुटी तातडीने सरकारने दूर कराव्यात, नाही तर हजारो भीमसैनिक आत्मदहनाचा मार्ग अवलंबतील. याची सर्व जबाबदारी ही सरकारची असेल, असा इशारा शिवसेनेचे संघटक विलास रुपवते यांनी सरकारला दिला आहे.

दादरमध्ये उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी बनवण्यात आलेल्या प्रतिकृतीमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे या पुतळ्याला गृहित धरून त्याप्रमाणे हुबेहूब पुतळा बनवू नये यासाठी एमएमआरडीएला आधीच निवेदन देण्यात आले आहे. मात्र, त्यावर अजूनही कोणतीही कार्यवाही सरकारने केलेली नाही किंवा त्यावर निवेदन केलेले नाही. सरकार या त्रुटी दूर करण्याबाबत उदासीन आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी आत्मदहनाचा इशारा रुपवते यांनी दिला आहे.

तर प्रत्येक दिवशी मंत्रालयासमोर आत्मदहन   

बाबासाहेबांच्या पुतळ्यातील त्रुटी दूर करण्याबाबत सरकार उदासीन आहे. या उदासीनतेला कंटाळून शोषित समाज दर दिवशी मंत्रालयासमोर जाऊन आत्मदहन करेल, असा इशारा रुपवते यांनी दिला आहे.