केईएम उपअधिष्ठातांचे कार्यालय हटवून मुतारी, शौचालय बांधण्याचा घाट

केईएम रुग्णालय ही हेरिटेज वास्तू आहे. त्यात असलेले उपअधिष्ठातांचे कार्यालय हटवून त्या ठिकाणी मुतारी आणि शौचालय बांधण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे हेरिटेज वास्तूला गालबोट लागणार आहे. त्यामुळे या हेरीटेज वास्तूचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी आणि ही वास्तू जतन करण्यासाठी मुतारी आणि शौचालयाच्या बांधकामाला स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक मेराज शेख यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

परळमधील केईएम रुग्णालय हे मुंबईतील नामांकित रुग्णालय असून ही वास्तू जागतिक हेरीटेज वास्तू म्हणून ओळखली जाते. या रुग्णालयामध्ये शेठ गोरधनदास वैद्यकीय महाविद्यालय असून इमारतीमध्ये तळमजला येथे जीवराज मेहता सभागृह असून त्याच्याशेजारी उपअधिष्ठाता कार्यालय इमारत स्थापनेपासून आहे. मात्र, हे उपअधिष्ठाता कार्यालय तोडून त्या ठिकाणी जीवराज मेहता सभागृहासाठी मुतारी आणि शौचालय बांधण्याचा घाट घातला जात आहे.

हा खटाटोप कोणासाठी?

इमारतीच्या तळमजल्याजवळ शौचालय आहे तसेच दोन मिनिटांच्या अंतरावर शौचालय आणि मुतारी पूर्वीपासून आहे. असे असताना हे उपअधिष्ठाता कार्यालय तोडून त्या ठिकाणी शौचालय व मुतारी बांधायचा खटाटोप कशासाठी आणि कोणासाठी सुरू आहे, असा सवाल विचारण्यात येत आहे.