निष्ठेचा जागर

शिवसेनेच्या स्थापनेपासून आतापर्यंत शिवसेनेत अनेक उलथापालथ, भूकंप, वादळे आली, गोंधळ उडाला. पण, तरीही शिवसेनेचे प्रमुख स्तंभ शिवसेना नेते सुभाष देसाई, राजन विचारे, अनंत गीते आणि दिवाकर रावते हे मजबुतीने उभे राहिले. बाहेर इतके सगळे घडतेय, लोक इकडून तिकडे पळताहेत, पण, तुम्ही शिवसेनेत कसे, असा सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी विचारला. अशा अनेक प्रश्नांना या चार नेत्यांनी निष्ठावंत शिवसैनिकांना आदर्श घालून देणारी उत्तरे दिली. संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत चर्चेचा विषय ठरली.

बाळासाहेबांनी शिवसेनेचे वेड नसानसांत भरले – सुभाष देसाई

शिवसेना हे एक वेड असून ते आधी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लागले. ते त्यांनी सर्वांच्या नसानसांत भरले. म्हणून आम्ही वेडे… तुम्ही म्हणालात वेडात दौडले… तसे दौडत राहिलो. अनेकजण उड्या मारताहेत, गडाबडा लोळताहेत, लोटांगणे घालताहेत. कदाचित पैशांच्या पावसात भिजतही असतील, पण आम्हाला त्यांचा हेवा नाही तर त्यांची किव वाटते, अशा शब्दांत शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आपण शिवसेनेत कसे, या प्रश्नाचे उत्तर दिले. ते म्हणाले बाळासाहेबांनी आम्हाला निष्ठेची, कडवटपणाची लस दिली आणि त्यामुळेच आज तुमच्या आमच्यासारखे हजारो, लाखो शिवसैनिक पाठीशी आहेत.

शिवसैनिकांनी काढली होती गद्दाराची धिंड – दिवाकर रावते

ठाकरे कुटुंबाला शिवसैनिकांबद्दल प्रचंड प्रेम आहे, असे शिवसेना नेते दिवाकर रावते म्हणाले. शिवसेना स्थापन झाल्यानंतर वर्षभरातच म्हणजेच 1967 साली पहिले बंड झाले. अ‍ॅडव्होकेट बळवंत मंत्री यांनी ते बंड केले. बळवंत मंत्री यांनी अचानक दादरच्या छबिलदास शाळेजवळ छोटी सभा बोलावली, परंतु शिवसैनिकांनी त्यांची सभा उधळून लावली. इतकेच नाही तर त्यांचे कपडे फाडून त्यांची अक्षरशः धिंड काढली. त्यांना बाळासाहेब आणि शिवसैनिकांची माफी मागायला लावली. त्यामुळे लक्षात ठेवा गद्दारांची धिंड काढायलाही कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक मागेपुढे पाहत नाही, अशा शब्दांत दिवाकर रावते यांनी गद्दारांना इशारा दिला.

पंतप्रधानांसमोर म्हणालो, भाड में गई सरकार – अनंत गिते

केंद्रीय मंत्री असताना तुमच्यातील शिवसैनिक अचानक कसा काय जागा झाला, असा सवाल संजय राऊत यांनी केला. यावर शिवसेना नेते अनंत गिते यांनी लोकसभेतील किस्सा सांगितला. अनंत गिते म्हणाले, त्यावेळी धाराशीवचे खासदार गायकवाड यांच्यावर देशभरात विमान प्रवास करण्यावर बंदी होती. त्यावेळचे विमान वाहतूक मंत्री व्ही. राजू कुणाचेच ऐकत नव्हते. मी ताडकन उठलो. त्यांच्या अंगावर धावून गेलो. सगळेच अवाक् झाले. सर्व खासदार म्हणाले, गीते साहेब तुम्ही सरकारमध्ये आहात, त्यावर मी म्हणालो, भाड में गई सरकार. पंतप्रधानांसमोर भाड में गई सरकार असे सांगणारा मी शिवसैनिक अनंत गिते आहे.

गद्दारीला माफी नाही, शिवसेना या चार अक्षरांशी प्रामाणिक – राजन विचारे

ठाण्यातील शिवसेना चोरीला गेली आणि तुमच्यातील शिवसैनिक अजूनही खंबीरपणे उभा आहे याकडे तुम्ही कसे पाहता, असे संजय राऊत यांनी विचारले असता शिवसेना नेते राजन विचारे म्हणाले, ठाण्याला गद्दारी नवी नाही. 1989 साली पहिली गद्दारी झाली, पण शिवसेनाप्रमुख आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी सांगितले, गद्दारांना माफी नाही. त्यावेळी दिघे यांनी 39 नगरसेवकांचे राजीनामे घेतले होते, अशी आठवण सांगतानाच ठाण्यातील शिवसैनिक कुठेही गेलेला नाही, असे राजन विचारे म्हणाले. तुम्हाला मोह कसा झाला नाही दुसरीकडे जाण्याचा, असा सवाल केला असता शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना या चार अक्षरांशी प्रामाणिक राहणार, असे विचारे म्हणाले.