मुंबईच्या सन्मानासाठी लढण्याची तयारी ठेवा, आदित्य ठाकरे कडाडले

धारावीचा घोटाळा कदाचित जगातील सर्वात मोठा घोटाळा असून पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबई लुटण्याचे काम सुरू आहे. परंतु जात, पात, धर्म, राजकीय भेदभाव विसरून मुंबईच्या सन्मानासाठी रस्त्यावर, मतदान केंद्रांवर उतरून लढण्याची तयारी ठेवा, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.

मुंबई लुटता यावी म्हणून तुम्हाला अनेक आमिषे दिली जातील. पैसे, पदांची लालुच दाखवली जाईल. तुम्ही विकले जाणार की मुंबईसाठी लढणार, असा रोखठोक प्रश्न त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना केला. त्यावर लढणार असा एकमुखी गजर झाला. एकदा का मुंबई अदानीच्या हातात गेली तर मुंबईकरांचे स्वप्न चिरडले जाईल. त्यासाठी मी एकटा उरलो तरी लढेन. रक्तबंबाळ होईपर्यंत लढेन, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या निर्धार शिबीरात केला.

धारावीतील दीड लाख कुटुंबांना अपात्र ठरवून बाहेर पाठवणार आणि मुंबईचा पुनर्विकास अदानी आपल्या हातात घेणार. धारावीसह मुंबईतील 1 हजार 80 एकरमध्ये कुणाला काही करायचे असले तर पालिकेला किंवा सरकारला विचारायचे नाही तर भाजपच्या एकमेव मालकाला म्हणजे अदानीला विचारावे लागेल. तुमची इमारत बांधायची असेल तर पहिला 50 टक्के टीडीआर अदानीकडून विकत घ्यावा लागेल. अदानीला वाटले तर त्या जमिनीवर विमानतळही बांधू शकतो. त्यासाठी राज्याच्या सरकारच्या परवानगीची गरज नाही. अशा रीतीने मुंबईला लुटू द्यायचे का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईला कसे लुटले जात आहे, आदित्य ठाकरे यांनी विस्तृतपणे सांगितले. मी चार रात्र धारावीचे टेंडर वाचत होतो. आजोबा, वडिलांप्रमाणे मलाही महत्त्वाचे मुद्दे हायलाईट करण्याची सवय आहे. धारावी पुनर्विकासाच्या टेंडरमध्ये इतक्या भयानक गोष्टी आहेत की त्या अधोरेखित करताना संपूर्ण टेंडरच हायलायटरमध्ये बुडवून काढू की काय असे वाटले. धारावीबरोबरच कुर्ल्यातील मदर डेअरीची, मुलुंडची, कांजूर मार्गची जमीन अदानीने गिळली. आता पश्चिम उपनगरातील जमिनी त्यांना हव्या आहेत. यापेक्षाही अनेक भयानक गोष्टी यात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईत मोठा रस्ते घोटाळा झाला असून हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवू, असे आव्हान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. तेव्हा दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करू, असे ते म्हणाले होते. त्याला आता किती वर्षे लोटली, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

मुंबई लुटण्याकरिता इतिहासात रमवले जाते

इतिहासात गांधी बरोबर होते की सावरकर असे विचारत आपल्याला एकीकडे भूतकाळात, इतिहासात रमवले जाते. हे एवढ्याचसाठी की वर्तमानातील प्रश्नांवरून आपले लक्ष विचलित व्हावे आणि यांना मुंबई लुटता यावी.

1 हजार 80 एकर जागा कुणाच्या घशात?

धारावीचा पुनर्विकास व्हायला पाहिजे. पण धारावीची जमीन साधारणपणे 300 एकर आहे. ही 300 एकर आणि बाजूची 240 एकर असा 540 एकर भूखंड अदानीला दिला गेला आहे. रेल्वेची जागा लीजवर दिली गेली आहे. खरेतर धारावीकरांचा पुनर्विकास 300 एकरवर होऊ शकतो. परंतु त्यांना तिथे तो करायचा नाही. त्याऐवजी मुंबईत इतरत्र अधिकची 540 एकर जागा दिली गेली आहे. कांजूर मार्गची जमीन मेट्रो कारशेडसाठी मागत होतो. त्यात जनतेचे 10 हजार कोटी वाचले असते. पण ती जागा मिठागरांची असल्याचे दाखवले. आता म्हणतात, ती मिठागरांची जमीन नाही. कारण ती जमीन आता अदानीला द्यायची आहे. या सगळ्यात दिली गेलेली मुंबईची 1 हजार 80 एकर जागा ही कुणाच्या घशात घालायची आहे आणि का घालायची आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. धारावीतला कोळीवाडाही त्यांना स्थलांतरित करायचा आहे. त्यामुळे येथील अनेक महिला बचत गट स्थलांतरित होणार आहेत. त्यांना मुलुंड, कांजूर मार्ग, घाटकोपर, कुलाबा, वरळीत कुठेही वसवतील. त्यांना व्यवसायाचे, पोटापाण्याचे काही साधन नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजपचा खासदारही डोळा मारतो…

कुठलेही शासकीय पद वा मंत्रीपद नसताना जी काही वट संजय राऊत यांनी दिल्लीत बनवली आहे ती पाहण्यारखी आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे कौतुक केले. राऊत यांच्यासोबत दिल्लीत फिरताना येणाऱ्या अनुभवांविषयी सांगत ते म्हणाले, राऊत यांचा आवाज देशात सगळीकडे जातो. तिथे दिल्लीतही भाजपचा खासदार भेटला की डोळा मारतो, गोदी मीडियातील कुणीतरी पत्रकार येऊन हात दाखवतो आणि म्हणतो संजयजी ठीक चल रहा है, ऐसेही चलने दो, ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वट आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात आयोजित शिवसेनेच्या निर्धार शिबिरात आज अक्षरशः कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिकांचे भगवे वादळ घोंघावले. मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याचा वज्रनिर्धार या वेळी करण्यात आला. भाजपप्रणीत महायुतीला खुले आव्हान देत शिवसेनेच्या रणरागिणी, शिवसैनिकांच्या गर्जनेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. जय भवानी… जय शिवाजी…. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है, आदित्य ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ आहे… अशा घोषणा देत शिवसैनिक नाट्यगृहाच्या परिसरात जमा होताना दिसत होते.

शिवसेनेच्या निर्धार शिबिराची शाहीर नंदेश उमप यांच्या पोवाड्याने जबरदस्त सुरुवात झाली. प्रबोधनकार ठाकरे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्भीड पत्रकार, वक्ता समाजसुधारकाच्या भूमिकेतून आणि आपल्या ज्वलंत भाषणांतून कशा प्रकारे अन्यायाने पिचलेल्या मराठी माणसाचे मन चेतवले, त्याच्या धमन्यांमध्ये स्वाभिमानाचे भगवे रक्त सळसळते ठेवले याची कहाणी नंदेश उमप यांनी पोवाड्यातून मांडली. त्याआधी गणरायाला नमन करण्यात आले. आमच्या वाटेतील सर्व विघ्ने दूर कर आणि आगामी महानगरपालिकेत भगवा झेंडा फडकू दे… असं मागणं त्यांनी गणरायाकडे मागितले. त्यानंतर गोंधळ घालून आई भवानीचा जागर करण्यात आला.

नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर भव्य अशी रांगोळी काढण्यात आली होती. त्यात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिकांना पेटून उठवणारा संदेश लिहिण्यात आला होता. नाट्यगृहाबाहेर शिवबंधन, भगवे झेंडे, बॅज, किचैन, मशाल आणि वाघ डरकाळी फोडतानाचे चित्र असलेली स्टिकर्स, भगवी उपरणे, पताका अशा विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यासाठीही शिवसैनिकांचा मोठा प्रतिसाद दिसला.

निर्धार शिबिरासाठी ईशान्य मुंबईच्या वतीने अतिशय चोख व्यवस्थापन करण्यात आले होते. नाट्यगृहाबाहेर वॉर्डनिहाय बूथ लावण्यात आले होते. त्यावर ओळखपत्र, कार्यक्रमाची रुपरेषा, सूचना असतील किंवा काही नोंद करावीशी वाटली तर नोंदवही आणि पेन अशी व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी 9 वाजल्यापासूनच या ठिकाणी शिवसैनिकांची गर्दी जमायला सुरुवात झाली. शिवसेनेच्या रणरागिणीही घोषणा देत येऊ लागल्या. घाटकोपरपासून विक्रोळी, भांडुप असे लिहिलेल्या आणि पदाधिकारी असलेल्या बूथवर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून सर्वांनी ओळखपत्रे घेतली.