सैफ अलीचा चोर दोन दिवसांत पकडला, गरीबांची घरे लुटणारे पोलिसांना सापडत नाहीत; वरुण सरदेसाई यांनी ठेवले अकार्यक्षमतेवर बोट

मुंबई पोलिसांची तुलना अलीकडच्या काळापर्यंत स्कॉटलंड यार्डशी होत होती, परंतु सत्यस्थितीत तफावत दिसते. सैफ अली खानच्या घरात शिरलेला चोर मुंबई पोलिसांनी दोन दिवसांत पकडला, पण गरीबांची घरे लुटणारे चोर मात्र पोलिसांना सापडत नाहीत, बीट चौक्या गर्दुल्ल्यांचे अड्डे बनल्या आहेत, तर सायबर सेल प्रचंड कमकुवत झाला आहे, असे दाखले देत शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी आज विधानसभेत पोलिसांच्या अकार्यक्षमतेवरच बोट ठेवले.

अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर विधानसभेत चर्चा झाली. त्यावेळी वरुण सरदेसाई यांनी गृह विभागाबद्दल अनेक मुद्दे मांडताना मुंबई पोलीस दलाला अद्ययावत करण्यासाठी अधिक निधी दिला गेला पाहिजे, असे सांगितले. तपासकामी पोलिसांकडून होत असलेल्या हलगर्जीकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. निधीअभावी सर्व्हिलन्स योजना बंद पडल्याने पोलिसांची गस्तच कमी झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

सांताक्रुझच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या शिवसेनेच्या उपशाखाप्रमुख वैशाली पार्सेकर यांच्या घराच्या छपरावरून मंकीमॅन घुसून त्याने दागिने चोरून नेले होते, मात्र अडीच महिन्यानंतरही पोलीस त्या चोराला पकडू शकलेले नाहीत. विचारणा करायला गेले असता वाकोला पोलीस ठाण्याचे निरीक्षक खराडे यांनी त्या मंकीमॅनला अटक करून कंटाळलो, अशी हतबलता व्यक्त केल्याचे आमदार सरदेसाई यांनी सांगितले. झोपडपट्टी भागांमध्ये सुरक्षेसाठी नाईट व्हिजनचे सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

…याकडे वेधले लक्ष

  • डिटेक्शनच होत नाही.
  • मोबाईल फोन चोरीचा एफआयआर घेतलाच जात नाही, साधी एनसी घेतात.
  • नाक्यानाक्यांवर पोलिसांच्या बीट चौक्या आहेत, पण त्याचा पोलीस नाही तर गर्दुल्ले ड्रग्ज सेवनासाठी वापरतात.
  • ड्रग्ज कुठे विकले जातात हे प्रत्येक पोलिसाला माहीत असूनही कारवाई केली जात नाही.
  • तक्रार केली तरी पोलीस सांगितलेल्या ठिकाणी पोहोचत नाहीत, पण एखाद्या बिल्डरने अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी सुरक्षा मागितली तर वरिष्ठ पोलीस निरीक्षकही तिथे पोहोचतात.
  • बाईकस्वारांकडून पैसे उकळण्यासाठी ट्रॅफिक पोलीस नाक्यांवर लपून बसतात.
  • ट्रॅफिक नियंत्रणासाठी मुंबईत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर होत नाही.