गोरगावमध्ये पाणी, रस्ते, रुग्णालये, मंडई आणि शिक्षणासारख्या मूलभूत सुविधांकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याची गंभीर दखल घेत आज शिवसेनेने पालिकेवर धडक देत प्रशासनाला जाब विचारला. यावेळी गोरेगावमधील सर्व समस्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले.
गोरेगावमध्ये अनेक नागरी प्रश्नांमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी नवनिर्वाचित आमदार ज. मो. अभ्यंकर व माजी नगरसेवक समीर देसाई उपस्थित होते. मागील सहा वर्षांपासून रखडलेल्या टोपीवाला मंडई व सिद्धार्थ रुग्णालयाच्या प्रश्नांकडे आयुक्तांचे लक्ष वेधले असता आयुक्तांनी याची संबंधित अधिकाऱयांकडून माहिती घेऊन व दीर्घ विलंबाबद्दल दिलगिरी व्यक्त करून दोन्ही प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. महापालिकेने खासगी संस्थांना शैक्षणिक वापरासाठी उपलब्ध करून दिलेल्या शालेय इमारती जीर्ण होऊन मोडकळीस आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याकडे अभ्यंकर यांनी लक्ष वेधले. त्यावर आयुक्तांनी इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्बाधणी करण्याचे धोरण अमलात आणण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱयांना दिल्या.
पाणी पुरवठा, नागरी सुविधा वाढवा
गोरेगावमध्ये होणाऱया पाणी पुरवठय़ात किमान 20 दशलक्ष लिटर इतकी वाढ करावी, जेणेकरून अनेक वस्त्या व सोसायटय़ांना जाणवणारी तीव्र पाणीटंचाई कमी होईल याकडे समीर देसाई यांनी लक्ष वेधले. यावर जल अभियंता यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. पश्चिम उपनगरातील मोठय़ा व सतत वाढणाऱया लोकसंख्येसाठी नागरी सुविधांची उपलब्धता वाढावी व प्रशासन गतिमान व्हावे यासाठी पश्चिम उपनगरासाठी नियुक्त असलेले अतिरिक्त आयुक्तांचे कार्यालय याच विभागात असावे, अशी मागणी सुभाष देसाई यांनी केली. त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन भूषण गगराणी यांनी दिले.