
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहात रविवारी निर्धार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात शिवसेना सेना आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांना बळाचा मंत्र दिला. युद्धामध्ये आम्ही माघार घेणार नाही, हेच शिवसैनिकांचं बळ आहे, असे सांगत फटे लेकिन हटे नही हा मंत्र शिवसैनिकांना दिला.
काय म्हणाले संजय राऊत?
मला दिल्लीत एका काँग्रेसच्या नेत्यानं विचारलं, शिवसेना कोणती जडीबुटी खाते, की इतके हल्ले होऊन पण तुम्ही ठामपणे उभे असता, लढता, संघर्ष करता. मी एवढंच सांगितलं एकच मंत्र आहे, ‘फटे लेकीन हटे नहीं’. आम्ही मागे हटत नाही. युद्धामध्ये माघार घेणं हे आम्हाला माहीत नाही आणि आम्ही माघार घेणार नाही, हेच शिवसैनिकाचं खरं बळ आहे. पहिलं लोकं मरायचे मग आत्मा भटकायचा, आता मिंध्यांसारख्या लोकांचा आधी आत्मा मरतो मग ते भटकत असतात. पहले लोक मरते थे फिर आत्मा भटकती थी, अब आत्मा मर जाती है और लोग भटक जाते है. असे आत्मा मेलेले लोक आपल्या समोर आहेत त्यांना भटकू द्या, त्यांच्याकडे आपल्याला फार लक्ष देण्याची गरज नाही.
आज या निर्धार शिबिरातून आपल्याला एक नवा विचार मिळाला आहे तो लढण्याचा. एक नवा निर्धार आपण केलेला आहे, पुन्हा एकदा महाराष्ट्राला गवसणी आपल्याला घालायची आहे. हे घोटाळे करून जिंकले. घोटाळे केले कारण आपण गाफील राहिलो, म्हणून हे जिंकले, असे संजय राऊत यांनी सांगितले. मी, राहुल गांधी, सुप्रिया सुळे आम्ही दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही प्रत्येक मतदार संघाचं गणित दाखवलं. लोकसभा ते विधानसभा या काळात महाराष्ट्रात 40 लाख मतं त्यांनी वाढवली. हे सगळे बाहेरचे लोक होते आणि त्या आधारे हा विजय त्यांनी मिळवला. 40 लाख मतं महाराष्ट्रात वाढतात आणि आम्हाला त्याचा थांगपत्ता लागत नाही.
पश्चिम बंगालमध्ये 10 लाख बोगस मतदार
मी ममता बॅनर्जी यांचं खास अभिनंदन करतो याक्षणी. विधानसभेच्या निवडणुका तिकडे पुढल्या वर्षी येताहेत. ममता बॅनर्जींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं. हरयाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये भाजप कशी जिंकली याचा त्यांनी अभ्यास केला. महाराष्ट्रात शिवसेनेचंच सरकार येणार याची त्यांना खात्री होती. दिल्लीमध्ये केजरीवाल जिंकतायत आणि हरयाणामध्ये काँग्रेस जिंकतंय, पण ते झालं नाही. असाच प्रकारचा निकाल पश्चिम बंगालमध्ये लागेल याची त्यांना भिती वाटतेय. त्यांनी अभ्यास केला असता महाराष्ट्रातलाच प्रयोग पश्चिम बंगालला सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. गेल्या तीन महिन्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये साधारण 10 लाख बोगस मतं वाढली.
तृणमूल काँग्रेसने आंदोलन सुरू केलं. तृणमूल काँग्रेस सुप्रीम कोर्टात गेली. निवडणूक आयोगाने तिथे प्रथम चूक मान्य केली, होय आम्ही चुकलो. निवडणूक आयोगाला या प्रकरणात मान्य करावं लागलं की इलेक्ट्रॉल फोटो आयडेंटिटी कार्ड नंबर एका राज्यात नंबर असताना दुसऱ्या राज्यातसुद्धा सापडले. त्या नंबरचे लोकं या पश्चिम बंगालच्या वोटर्समध्ये सापडले. एखाद्या राज्याचा जय-पराजय बदलण्यासाठी भाजपने हे लाखो आकडे अशा प्रकारे निर्माण केले. म्हणून महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागला तो आम्हाला मान्य नाही. हा अपघात नाही आघात आहे, असे संजय राऊत म्हणाले.
उद्या महानगरपालिका आहे. हिम्मत असेल त्यांची तर येतील. पण आपण सावध असायला पाहिजे. आपण संकल्प केला पाहिजे की अशा प्रकारचा घोटाळा आम्ही होऊ देणार नाही. आणि माझ्या माझ्या बुथवर हे जे बदमाश घोटाळे करताहेत त्यांना मी जागच्या जागी अडवेन, निवडणूक आयोगाला कळवेन, निवडणूक आयोगाला कळवेन, लोकांसमोर आणेन हे आपल्याला आता करणं गरजेचं आहे.