
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहात रविवारी निर्धार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात शिवसेना सेना आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या खुमासदार भाषणाने शिवसैनिकांमध्ये जोश भरला. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहनही शिवसैनिकांना केले. यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून पुन्हा एकदा आम्ही लढायला तयार असल्याचे सांगितले. तसेच एकदा झालेली ती चूक परत होता कामा नये, असे आवाहनही संजय राऊत यांनी शिवसैनिकांना केले.
सकाळपासून निर्धार मेळाव्यात ठाण मांडून बसलेल्या शिवसैनिकांचं कौतुक करत हाच शिवसैनिक बाळासाहेबांना अपेक्षित असल्याचे म्हटले. मधल्या काळात आपण ढिले पडलो. आधीप्रमाणे शाखाशाखांमध्ये नव्याने सर्व कार्यक्रम, उपक्रम सुरु करत नाही तोपर्यंत पक्षाची पुनर्बांधणी होणार नाही. हा निर्धार मेळावा फक्त मुंबईला नाही तर या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि शिवसेनेला दिशा देणारा असल्याचे संजय राऊत पुढे म्हणाले.
आला अंगावर की घ्या शिंगावर
शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेलं हे बीज आहे. हे असं कोणाला उखडता येणार नाही. गंगेत डुबक्या मारायला गेले. मगाशी शिवसेनाप्रमुखांचं भाषण ऐकलंत तो शिवसेनाप्रमुखांचा विचार आहे. त्या विचारातून तुम्हाला कळलं असेल माननीय बाळासाहेबांना कशाप्रकारचा शिवसैनिक अपेक्षित आहे. आता वाट बघायची नाही आदेशाचीसुद्धा. आला अंगावर की घ्या शिंगावर. तरच हा महाराष्ट्र वाचेल, मुंबई वाचेल. शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड, बेईमानीची वाळवी संपवायची असेल तर शिवसैनिकांनी बाहेर पडलं पाहिजे. शिवसैनिक आहे, शिवसेनेचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. पण सगळं शांतपणे बसल्यासारखं आहे. ज्या दिवशी हे वारुळातून बाहेर पडतील त्या दिवशी हे गद्दार बिळात गेल्याशिवाय राहणार नाहीत.
भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी आहे हेच फेक
आपल्याविषयी, महाविकास आघाडीविषयी वेगळ्यावेगळ्या बातम्या पसरवल्या जाताहेत. सगळ्यात मोठं फेक नरेटिव्ह जे असेल ते भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी आहे हेच फेक आहे. त्याच्यासारखा खोटारडेपणा नाही, हे फेक आहे. असं सांगतात तुम्ही काँग्रेसबरोबर गेल्यामुळे तुमचं नुकसान झालं. अख्या भारतीय जनता पक्षाची काँग्रेस झालेली आहे. भारतीय जनता पक्षात ओरिजनल काय आहे? भारतीय जनता पक्षामध्ये 80 टक्के लोक काँग्रेसचे आहेत. त्या काँग्रेसवाल्यांना मांडीवर, अंगावर घेतलंय. ते तुम्हाला चालतं. स्वातंत्र्य आंदोलनात काँग्रेसने सहभाग घेतला म्हणून स्वातंत्र्य मिळालं, ते तुम्हाला स्वातंत्र्य चालतं. तेव्हा तुम्ही कुठे होतात. आज आम्ही तुमच्याशी लढण्यासाठी काँग्रेसची मदत घेतली म्हणून तर तुमच्या अंगाचा तीळपापड होतोय. सगळे भ्रष्टाचारी काँग्रेसवाले भाजपमध्ये आहेत. अजित पवार असतील, अशोक चव्हाण असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, सगळे भ्रष्ट काँग्रेसवाले भाजपमध्ये आहेत आणि तुम्ही आमच्यावर बोट उचलता. तुम्ही काँग्रेसबरोबर गेलात, तुम्ही राष्ट्रवादीबरोबर गेलात. शिवसेना ही गरुड पक्षासारखी आहेत. ती जमिनीवर वाघ असते आणि ती जेव्हा ती उड्डाण घेते तेव्हा तो गरुड पक्षी असतो. या दोघांचा पराभव करता येत नाही, अशा प्रकारचा शिवसेनेचा आत्मा आहे.
आजच्या शिबिराचा एक उद्देश आहे की, सावधान आणि जागृकता असल्याशिवाय आपल्यापुढे यापुढची राजकीयदृष्ट्या लढाई लढता येणार नाही. आम्ही मारामाऱ्या करु, संघर्ष करू, आम्ही लढू, विधानसभेत लढे देऊ. पण ही कागदावरची लढाई आहे, ही लढण्यामध्ये भाजपचे लोकं, आरएसएसचे लोकं काम करताहेत आणि आपला विजय हे चोरून नेताहेत. ही एकदा झालेली चूक परत होता कामा नये, अशा शब्दात संजय राऊत यांनी शिवसैनिकांना बजावले.