हे सर्व घडवलेले नाट्य? शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केली शंका

वाल्मीक कराड महाराष्ट्रात लपला असूनही पोलिसांना सापडला नाही. धनंजय मुंडे-देवेंद्र फडणवीस यांची काल भेट होते आणि आज कराड शरणागती पत्करतो, हा योगायोगच म्हणावा लागेल. पोलिसांच्या हाताला न लागताच तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा, हे सगळे घडवलेले नाट्य आहे का? अशी शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात येत आहे, असे शिवसेना नेते भास्कर जाधव म्हणाले.

बीडच्या घटनेचा कर्ता-करविता वाल्मीक कराड आहे, असे संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करून सांगत आहे. महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचे नाव खूप मोठे आहे. पण, नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी परिस्थिती आज झाली आहे, असे आमदार भास्कर जाधव म्हणाले.

वाल्मीक कराडला शोधण्याकरिता पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली, राज्यकर्त्यांनी मोठी आवाहने केली आणि पुण्यात स्वतः वाल्मीक कराड शरण येतो, सरेंडर होतो, पण पोलिसांच्या हाताला लागत नाही किंवा आजच तो शरण झाला यावरही शंका उपस्थित व्हायला निश्चितपणे जागा आहे.