निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पदाधिकाऱ्यांना अटक हे भाजपचे षडयंत्र!

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पदाधिकाऱ्यांना अटक होणे, हे भाजपचे फार मोठे षडयंत्र आहे. ज्या खटल्यात अटक करण्यात आली ते प्रकरण 17 वर्षांपूर्वीचे आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते. हे प्रकरण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उकरून काढून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सात पदाधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडीत डांबून ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला. मात्र भाजपने रचलेले षडयंत्र मात्र यशस्वी झाले नसल्याचा घणाघात शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी केला आहे.

17 वर्षांपूर्वी रिलायन्सच्या महामुंबई सेझविरोधात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेने छेडलेल्या आंदोलनाचा खटला सुरू आहे. या खटल्यात माजी आमदार जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, उरण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास म्हात्रे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.

दरम्यानच्या काळात राज्य सरकारने अनेक राजकीय खटले निकाली काढले किंवा रद्द केले आहेत. याच गैरसमजुतीतून मागील काही सुनावण्यांना शिवसेना पदाधिकारी अनुपस्थित राहिले. मात्र न्यायालयाने या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात अटक वारंट जारी करून १६ ऑक्टोबर रोजी हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शिवसेनेचे सातही पदाधिकारी न्यायालयात हजर झाले आणि त्यांना अटक करण्यात आली.