काहींना आग लावणं म्हणजे विकास वाटतो, हिंमत असेल तर महापालिका निवडणुका घ्या; आदित्य ठाकरे यांचा टोला

काही लोकांना विकास हा काय असतो हे माहिती नाही. काही लोकांना आग लावणं म्हणजे विकास वाटतो. आम्हाला आमच्या महाराष्ट्राची, मुंबईची काळजी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (महापालिका, नगरपालिका) रखडल्या आहेत. अनेक ठिकाणी घडी विस्कटली आहे. परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून आपण मुंबईतील समस्यांचा मुद्दा मांडला. मुंबईतील कारभार नीट व्हावा, अशी आमची भूमिका आहे. प्रत्येक वेळी फेरगुजरात मॉडेल आम्हाला ऐकवू नका. थोडी हिंमत दाखवा आणि मुंबई महापालिकेसह इतर सर्व पालिकांच्या निवडणुका घ्या, असं सांगत शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.

मुंबईत गेली दोन वर्षे स्थानिक नगरसेवक नसल्यामुळे महापालिका हद्दीतील अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. महापालिका रुग्णालयांची अवस्था बिकट झाली आहे. या सर्व प्रश्नावर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत लक्ष वेधले. विधानसभेत लक्षवेधी मांडत आदित्य ठाकरे यांनी महापालिका रुग्णालयातील विविध समस्या सभागृहात मांडल्या. महापालिका रुग्णालयातील कॉन्ट्रॅक्ट, शेड्यूल आणि नवीन टेंडर बाबतच्या समस्या आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

सायन रुग्णालयात गेल्या वर्षी जवळपास एक लाख आयव्ही फ्ल्यूएडच्या बाटल्या या डोनेशनमधून घ्यावा लागल्या. मेडिकल ऑक्सिजनचं टेंडर संपलंय. त्याचं नूतनीकरण अद्याप झालं नाही. एक्स रे फिल्मचा स्टॉक देखील कमी आहे. त्याचंही नवीन टेंडर अजून काढलं नाही, काढलं असेल तरी निविदा प्रक्रिया पूर्ण केली नाही. डॉक्टरांचं प्रमोशन एक वर्षापासून थांबलंय. त्यामुळे बाकी कर्मचाऱ्यांचंही प्रमोशन थांबतंय, याकडे आदित्य ठाकरेंनी लक्ष वेधले.

सायन रुग्णालयाप्रमाणे नायर रुग्णालयाची परिस्थिती आहे. मागे हॉस्टेलमध्ये आग लागली होती. आगीचा तपास केला असता कळलं की फायरची एनओसीच नव्हती. मग कळलं की ती इमारत वापरातच नव्हती आणली. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीआधी तिथल्या हॉस्टेलचं उद्घाटन केलं होतं, याची जाणीवही आदित्य ठाकरे यांनी करून दिली.

काही प्रशासकीय गडबड झाली तर दुर्दैवाने तिथल्या डीनवर किंवा डॉक्टरवर बोट दाखवलं जातं. हे थांबलं पाहिजे. डीनकडे बोट दाखवून चालणार नाही. सर्वांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. किती प्रशासकीय प्रेशर तुम्ही त्या डीनवर आणि डॉक्टरांवर टाकणार आहात? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.