मुंबईत मराठीचा पुन्हा अवमान, गुजरातीची सक्ती; रुपम शोरूम मॅनेजरला शिवसेनेचा दणका

मुंबईत मराठी भाषेचा अवमान होण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. क्रॉफर्ड मार्केटमधील रुपम शोरूमच्या मॅनेजरने एका मराठी तरुणाला गुजराती किंवा हिंदी भाषेतच बोलण्याची सक्ती केली. शिवसैनिकांनी त्या मॅनेजरला चांगलाच दणका दिल्यानंतर त्याला हात जोडून मराठीत माफी मागावी लागली.

रुपम शोरूमच्या मॅनेजरने आपल्याला गुजराती किंवा हिंदी भाषेतच बोलायचे अशी जबरदस्ती केली आणि मी मराठी भाषेत बोलणार नाही असेही अरेरावीने सांगितल्याची तक्रार या मराठी तरुणाने शिवसेना विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्याकडे केली होती. शिंदे आणि शिवसैनिकांनी तातडीने रुपम शोरूम गाठून त्या मॅनेजरला जाब विचारला. मॅनेजरला मराठी भाषेत माफी मागायला भाग पाडले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबईकरांनी त्यावर कमेंट्स करून शिवसेनेचे काौतुक केले आहे.