गेल्या दोन महिन्यांपासून शिवडी विधानसभेतील विविध प्रभागांमध्ये पाणीटंचाईची गंभीर समस्या आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांसह शिवसेनेने पालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला तरी आश्वासनांपलीकडे रहिवाशांना काहीच मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर उद्या, मंगळवारी सकाळी 10 वाजता शिवसेनेच्या वतीने पालिकेच्या एफ दक्षिण कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे.
शिवडी विभागातील पाणीटंचाईसंदर्भात रहिवाशांच्या अनेक तक्रारी आमदार अजय चौधरी यांच्याकडे आल्या आहेत. त्या तक्रारी त्यांनी जल विभाग, एफ दक्षिण विभागाकडे पाठविल्या; परंतु आश्वासनाशिवाय काहीही कार्यवाही झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ‘एक एल्गार पाण्यासाठी, आमच्या हक्कासाठी’ असे म्हणत पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कामगार मैदान, परळ ते एफ दक्षिण कार्यालय या दरम्यान ‘हंडा मोर्चा’ काढणार आहेत. शिवडी विधानसभेतील हजारो रहिवाशी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार आहेत.