कोंबडीचोरांना गाडायला उद्धव ठाकरे कोकणात येणार, विनायक राऊत यांचे नारायण राणेंना चोख प्रत्युत्तर

नारायण राणे यांच्या बुध्दीची मला कीव येते. कोंबडीवडे फक्त हॉटेलातच मिळत नाहीत तर कोकणातल्या घराघरात कोंबडीवडे मिळतात. या कोंबडीचोरांना कोंबडीवड्याची काय किंमत कळणार? शिवसेना आणि कोकणचे नाते हे वेगळे आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकणात येतील ते या कोबडीचोरांना गाडायला असा खणखणीत इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना दिला.

भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर टीका केली होती. त्याला माजी खासदार विनायक राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. राऊत म्हणाले की, नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोकणाच्या वाट्याला काही मिळाले नाही. महाराष्ट्रात येणारे अनेक प्रकल्प हे गुजरातमध्ये जात आहेत. हे येथील राज्यकर्त्यांचे अपयश आहे अशी टीका त्यांनी केली. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. वयोश्री योजना बंद पडली. शिवभोजन योजना बंद पाडली. लाडक्या बहिणींना फसवले. फक्त विमा कंपन्यांचा फायदा करण्यासाठी पीक विमायोजना सुरु केल्या आहेत. पीक विमायोजनांमधून शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही. फक्त विमा कंपन्यांचा फायदा करून दिला जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला. कालच एसटी कर्मचाऱ्यांचा 56 टक्के पगार केला. त्यांना मिळतो पगार 15 ते 20 हजार रुपये. आणि त्यात 56 टक्के पगारात त्यांनी कुटुंब कसे चालवायचे? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

गोगावले नव्हे शिंदेंचीच गोची

गोगावलेचे पालकमंत्रीपद सोडा. भाजप एकनाथ शिंदेचीच गोची करत आहे. कालच प्रताप सरनाईक अध्यक्ष असलेल्या एसटी महामंडळाची दुर्दशा करून टाकली. ठाण्यातील प्रकल्प बंद केले. आता एकनाथ शिंदे यांनाच घरी पाठवण्याची तयारी भाजप करत असल्याची टीका त्यांनी केली.

जनतेशी संवादासाठीच महाराष्ट्रभर दौरे

16 एप्रिल रोजी नाशिक येथे पदाधिकाऱ्यांचे शिबीर होत आहे. या शिबिरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर विदर्भ मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दौरे होणार आहेत. या भाजपच्या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला फसवले आहे. जनता आक्रोश करत आहे. त्या जनतेला साथ देण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर दौरे करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.