शिवसेनेच्या अति विराट दसरा मेळाव्यात उपस्थित शिवसैनिकांसमोर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नेहमी प्रमाणेच तडाखेबंद भाषण केलं. शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय राऊत यांनी मिंधेंच्या मेळाव्यावरून तुफान टीका करत त्यांच्या गटाचा जन्म सुरत मध्ये झाला असून तिथेच मेळावा घ्या, अशी टीका केली. तसेच आझाद मैदानात सुरू असेलल्या मिंधे गटाच्या मेळाव्याला लक्ष्य करताना ‘नाव आझाद मैदान आणि व्यासपीठावर सगळे मोदींचे गुलाम’, अशा शब्दात अक्षरश: सालटी काढली.
यंदा प्रथमच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचं शिवतीर्थावर भाषण झालं. त्याचा उल्लेख करत ‘आदित्य ठाकरे यांचं भाषण ही शिवसेनेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे’, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. ‘आता आपण लहान मुलगे राहिलेले नाहीत. देशाचे राज्याचे मोठे नेते झाला आहात हा देश फार अपेक्षेने त्यांच्याकडे पाहात आहे’, असं संजय राऊत म्हणाले.
या मशालीला सुद्धा यापुढे शस्त्राचा दर्जा द्यावा लागेल!
या देशात अनेक शस्त्र आहेत. विविध शस्त्रांची पूजा येथे केली जाते. नागपूर येथेही सकाळी शस्त्र पूजा झाली. आपण इथे शस्त्र पूजा करत आहोत. आता आमच्या शस्त्रात नवीन शस्त्र आलं आहे ते शस्त्र म्हणजे मशाल. या मशालीला सुद्धा यापुढे शस्त्राचा दर्जा द्यावा लागेल अशा प्रकारचं हे शस्त्र आमच्या हाती आली आहे. एक चिंगारी काफी है मशाल जलाने के लिए, और एक मशाल ही काफी है ज्वालामुखी उठाने के लिए। ही सगळी ज्वालीमुखी आज शिवतीर्थावर धगधगताना दिसते आहे. या मशाली पेटलेल्या आहेत, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
‘हा निष्ठावंताचा महाराष्ट्र आहे. हा स्वाभिमान्यांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा हा महाराष्ट्र आहे. त्याच निष्ठावंतांचा हा विराट मेळावा आख्खा देश पाहतो आहे’, असंही त्यांनी सांगितलं.
जेव्हा जेव्हा ठाकऱ्यांच्या तीन पिढ्यांनी महाराष्ट्राला लढण्याचे आव्हान केलं तेव्हा तेव्हा हा महाराष्ट्र त्यांच्या पाठी मागे लढायला उभा राहिला आहे. मला असं वाटतं की मशालीसारखं दुसरं कोणतं चिन्हं नाही. मशाल ही ENEMY OF DARK आहे. हा जो अंधाकारा महाराष्ट्रात देशात पसरला आहे तो दूर करण्यासाठी मशाल हवी, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
टाटा आणि ठाकरे विश्वासाचं दुसरं नाव!
उद्योगपची रतन टाटा यांच्या निधनाच्या वृत्ताचा धागा पकडत संजय राऊत यांनी दोन घराण्यांमधील साम्य दाखवलं. ‘दोन दिवसांपूर्वी आपल्या देशाचे सुपुत्र रतन टाटा यांचे निधन झालं. उद्योगपती गेल्यावर देश हळहळत नाही करण उद्योगपती सामान्यांना आपले वाटत नाही. पण टाटा गेल्यावर संपूर्ण देश हळहळला कारण गेली अनेक शतकं टाटा म्हणजे विश्वास होता. विश्वासाचं दुसरं नाव ठाकरे आहे. हे लक्षात घ्या. विश्वास म्हणून हा महाराष्ट्र इतक्या वादळात ठाकऱ्यांच्या मागे उभा राहिला’, असं संजय राऊत यांनी ठामपणे सांगितलं.
नाव आझाद मैदान आणि व्यासपीठावर सगळे मोदींचे गुलाम…
‘ही देवाची आळंदी आहे. चोरांची आळंदी आझाद मैदानात भरलेली आहे. नाव आझाद मैदान आणि व्यासपीठावर सगळे मोदींचे गुलाम आहेत. आझाद मैदानाची तर लाज ठेवा. गुलामांचा मेळावा आझाद मैदानावर. शिवतीर्थावरील मेळाव्याला 50 – 55 वर्ष झाली. माननीय शिवसेनाप्रमुखांनी सुरू केलेला हा मेळावा आहे. तिकडे आझाद मैदानावर मेळावा घेणाऱ्यांनी तो मेळावा सुरत, गुजरातला घ्यायला हवा होता. कारण त्यांच्या पक्षाचा जन्म शिवतीर्थावरून झाला नसून सुरतच्या गर्भातून झाला होता. आपलं जेव्हा दोन महिन्यांनी सरकार आलं की सांगू तो पर्यंत जीवंत राहिला, वाचलात तर तुमचा मेळावा हा सुरतला घ्या. ते तुमचं जन्मस्थान आहे. महाराष्ट्र नाही, अशा सणसणीत शब्दात त्यांनी मिंध्यांवर जबरदस्त हल्लाबोल केला.
‘निकाल लागले हरियाणात आणि पेढे वाटतात फडणवीस. काय तर म्हणे आम्ही हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात विजय मिळवू. निकाल तिकडे लागले आहेत हे इथे छाती फुगवून चालताहेत. निवडणुका होऊ द्या तुमच्या छातीतली हवा आम्ही टाचणी लावून काढू. हरयाणाचे निकाल फार इंट्रेस्टिंग आहेत सकाळी दहा पर्यंत काँग्रेसपक्ष आघाडीवर होता. 12 वाजता भाजपने सरकार बनवले. हा चमत्कार कसा झाला? भाजपला 39.9 टक्के मतं मिळाली आहेत. समजून घ्या काँग्रेसला 39.3 टक्के मतं मिळाली. फक्त पॉइंट सहा टक्क्यांचा फरक आहे आणि एवढ्याशा फरकाचा भाजपला 30 जागांवर फायदा झाला ही गोष्ट कुणाच्याही कल्पनेत बसणारी नाही. हा EVM घोटाळा असल्याशिवाय या चोऱ्या लबाड्या असल्याशिवाय हरयाणा मध्ये काँग्रेसचा पराभव होऊ शकत नाही. हरयाणात जे घडलं ते महाराष्ट्रात घडणार नाही. हा महाराष्ट्र वेगळ्या दिशेनं, वेगळ्या मार्गानं चाललेला आहे’, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
‘आज आम्ही येथे विचारांचं सोनं लुटायला जमलेलो आहोत. पण काही लोकं महाराष्ट्र लुटण्यासाठी आलेले आहेत. ही लूट थांबवायची असेल तर या राज्याची सूत्र आपल्याला पुन्हा एकदा माननीय उद्धव ठाकरेंच्याकडेच द्यावी लागतील आणि महाराष्ट्र वाचवावा लागेल’, असं संजय राऊत म्हणाले.
आज महाराष्ट्राचा कारभार कसा चाललेला आहे हे एका वाक्यात सांगता येईल. थोडा असंसदीय शब्द असेल तर कान बंद करा. महाराष्ट्राचा कारभार एका वाक्यात सांगायचा तर ‘कावळ्यांकडे दिला कारभार त्यानं हगून भरला दरबार’ , अशी घाण महाराष्ट्रात या लोकांनी केली. यानंतर मंचावर उपस्थित भास्कर जाधव यांनी हा शब्द असंदीय नसल्याचं सांगितलं, असं सांगत राऊत म्हणाले की हगणदारी मुक्त गाव अशी सरकारची योजना आहे तसं आपल्याला मंत्रालय हगणदारी मुक्त करायचं आहे, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला.