दहावीतल्या गरीब विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांनी परीक्षेत घवघवीत यश मिळवावे यासाठी शिवसेना दिंडोशी विधानसभा क्षेत्राच्या वतीने विभागातील 16 शाळांमधील सुमारे तीन हजार तर गोरेगावमधील 10 शाळांमधील 500 विद्यार्थ्यांना मोफत प्रश्नसंचाचे वाटप करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते–आमदार सुनील प्रभू, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उपनेते भाऊ कोरगावकर आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू उपस्थित होते.
दहावीत शिकणाऱया गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाअभावी गुणवत्ता असूनही बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण संपादन करता येत नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांच्या संकल्पनेतून आणि विधानसभा संघटक प्रशांत कदम व माजी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर यांच्या माध्यमातून उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला शाखा संघटक, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख महिला-पुरुष यांच्या वतीने विभागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना तज्ञांनी तयार केलेल्या गुणवत्तापूर्ण सराव प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिंडोशी विधानसभा क्षेत्रात विधानसभा संघटक रीना सुर्वे, पूजा चौहान, युवासेना विभाग अधिकारी प्रशांत मानकर व युवती विभाग अधिकारी श्रुतिका मस्तेकर, गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील पूर्व भागात उपविभागप्रमुख सुधाकर देसाई, शाखाप्रमुख अजित भोगले यांच्या सहा पदाधिकारी यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी-कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.
प्रत्येक विषयाच्या सात प्रश्नपत्रिका असलेले पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.
यात मराठी, इंग्रजी, बीजगणित, भूमिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपर-1, विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपर-2, इतिहास-राज्यशास्त्र, भूगोल-अर्थशास्त्र, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, इंग्लिश रीडर, हिंदी अशा विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत.