धारावीकरांच्या मर्जीशिवाय पुनर्विकास प्रकल्पाची एक वीटही रचू देणार नाही! धारावी बचाव आंदोलनात सर्वपक्षीयांचा सरकारला इशारा

सर्व धारावीकरांचे पुनर्वसन हे धारावीत व्हायला पाहिजे. घराच्या बदल्यात 500 फुटांचे घर आणि दुकानाच्या बदल्यात दुकाने मिळाली पाहिजेत. हा हक्क मिळेपर्यंत आम्ही आमचा लढा सुरू ठेवू. धारावीकरांना त्यांचा हक्क द्या, तो हक्क दिल्यानंतरच या प्रकल्पाला हात लावा. सरकारने प्रकल्पात लपवाछपवी करू नये, सर्वांना मास्टर प्लॅन दाखवा, प्रकल्पात पारदर्शकता ठेवा. धारावीकरांना विश्वासात घ्या. धारावीकरांना विश्वासात घेता येत नसेल तर धारावीकरांच्या मर्जीशिवाय प्रकल्पाची एक वीटही रचू देणार नाही, असा इशारा धारावी बचाओ आंदोलनातील सर्वपक्षीय मान्यवरांनी राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, अदानी हटाव, धारावी बचाव, ये देश हमारा, ये मिट्टी हमारी है, और ये धारावी हमारी है, लढेंगे-जितेंगे, अदानी मोदी भाई भाई, बेच बेच के खाये मलाई, संघर्षो की चले मशाल, भागे दुश्मन और दलाल अशा धारावीकरांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

धारावीमध्ये अदानीचा मीडियातून सुरू असलेला खोटा प्रचार, सर्वेक्षण, राज्य सरकार आणि अदानीची प्रकल्पातील सुरू असलेली लपवाछपवी, धोकेबाजी, पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतील मोक्याच्या जागा लाटण्याचे षडयंत्र, धारावीकरांना मुंबईतून उपनगरात फेकण्याचा डाव अशा सर्व गोष्टींचा पर्दाफाश करण्यासाठी धारावी बचाव आंदोलन समितीच्या वतीने आज सर्वपक्षीय भव्य सभा झाली. यात शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार बाबुराव माने, धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक राजेंद्र कोरडे, माजी नगरसेविका मारिअम्मल तेवर, राष्ट्रवादीचे उल्लेश गजाकोश, धारावी संघटक विठ्ठल पवार, धारावी समन्वयक सुरेश सावंत, माजी नगरसेवक वसंत नकाशे, शाखाप्रमुख भास्कर पिल्ले, सुरेश जाधव, आनंद जाधव, गणेश पटकन, माजी शाखाप्रमुख जगन्नाथ खाडे, राजा नारकर, आम आदमी पक्षाचे पॉलभाई, नसरुलभाई, इशरतआप्पा, माकपचे शैलेंद्र कांबळे, अॅड. साम्या कोरडे, अनिल कासारे, विभाग संघटक कविता जाधव, माया जाधव, रामल्ला जैसवाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्रत्येकाला घर मिळेपर्यंत हा लढा सुरू राहणार!

धारावीकर पिढ्यान्पिढ्या इथे राहत आहेत. राज्य आणि केंद्राच्या मदतीने अदानीचा हा प्रकल्प लोकांच्या माथी मारत आहे. लोकांना बाहेरून पकडून आणले जात असून त्यांचे प्रकल्पाला पाठिंबा असल्याचे दाखवले जात आहे, मात्र वास्तव तसे नाही. सर्व्हे खोटा आहे. सरकार आणि अदानीच्या खोटेपणाला धारावीकर भुलणार नाहीत. प्रत्येकाला स्वतःचे हक्काचे घर मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील, असा निर्धार शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांनी बोलून दाखवला.

आता दर दहा दिवसांनी होणार सभा

धारावीकरांमध्ये जनजागृती करण्यासाठी धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने दर हा दिवसांनी धारावीत सभा घेण्यात येणार आहे. धारावीतील प्रत्येक घरात सरकार आणि अदानीविरोधात, त्यांच्या खोटारडेपणाविषयी सभेतून माहिती दिली जाणार आहे. धारावीकर एकजूट राखून आम्हाला साथ देतील, असा विश्वास धारावी बचाव आंदोलनातील मान्यवरांनी दिला.