त्याग, सेवा, निष्ठा, कष्ट आणि समर्पण म्हणजेच शिवसेना! शिवसेना उपनेते संजय पवार यांचे प्रतिपादन

त्याग, सेवा, निष्ठा, कष्ट आणि समर्पण म्हणजेच शिवसेना. पण सत्तेसाठी केंद्रीय यंत्रेणेचा गैरवापर करून सत्तेवर आलेल्या स्वार्थी भाजपच्या खोट्या हिंदुत्वाचा पर्दाफाश करण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले.

विधानसभा ग्रामीणमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शुक्रवारी (दि. 18) शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. यावेळी उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पराभवाने खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व सरपंच निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर दक्षिण विधानसभा ग्रामीण व करवीर विधानसभा क्षेत्रातील गावागावांत जाऊन बैठकी घेण्याचे नियोजन करण्यात यावे. तसेच सर्व इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच बी.एल.ए., गटप्रमुख व पक्षसंघटन मजबूत करून निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना केल्या.

संजय पवार म्हणाले, सत्तेसाठी शिवसेना फोडली. ईडी, सीबीआय व इतर यंत्रणेच्या भीतीपोटी काहीजण पक्ष सोडून गेले. तरीही महाराष्ट्रातील शिवसेनेचे लाखो मावळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासत पुन्हा शिवसेना पक्ष मोठा करीत आहेत. हिंदुत्व हा कुठल्या एका पक्षाचा ठेका नसून ती एक राष्ट्रीय विचारधारा आहे. ज्या पक्षाला बैठका मारायला शिवसेनेने शिकवले, तो पक्ष आज आमच्यासमोर दंड फुगवतोय. त्याला योग्य धडा शिकवणे हेच या स्वाभिमानी शिवसैनिकाचे काम असून, पुन्हा एकदा शिवसेनेला सुवर्णदिवस आणण्यासाठी निष्ठेने आणि श्रद्धेने प्रयत्न करू. ‘घर तेथे शिवसैनिक आणि गाव तिथे शिवसेना’ हे आपले ब्रीदवाक्य अंगीकारून कष्टाने काम करूया, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हा महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.