जोगेश्वरीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करा, शिवसेनेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

जोगेश्वरी पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गाखालील स्टेशनकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाच्या रुंदीकरणासाठी वाहतूक विभागाची परवानगी मिळत नसल्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून हे काम रखडले आहे. हे काम सुरू करण्यासाठी आवश्यक ती परवागनी देण्याचे निर्देश संबंधितांना देऊन जोगेश्वरीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करा, अशी मागणी शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांनी  पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे केली.

जोगेश्वरीमधील संजय गांधी नगर स्थित भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे शेवटच्या टप्प्यातील  काम वाहतूक विभागाच्या परवानगीअभावी खोळंबले आहे. परिणामी मागील अनेक महिन्यांपासून जोगेश्वरीतील नागरिक आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीदेखील या भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वास गेल्यास सुटणार आहे. यासंदर्भात अनेकदा वाहतूक विभागाकडे पाठपुरावा करून हे काम करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. मात्र वाहतूक विभागाकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. यासंदर्भात आमदार बाळा नर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन जोगेश्वरीतील वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधत भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामास परवानगी देण्याचे निर्देश वाहतूक विभागाला द्यावेत, अशी विनंती केली.

नवीन काँक्रीट रस्त्यावर गतिरोधक बसवा

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात क्राँक्रीटीकरण करून तयार करण्यात आलेल्या नवीन रस्त्यांवर कुठेही गतिरोधक बसविलेले नाहीत. यामुळे गाडय़ा भरधाव वेगाने चालविल्या जातात. त्यामुळे रस्त्यावरून जाणारे विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेता नवीन काँक्रीट रस्त्यांवर गतिरोधक बसविण्याच्या सूचना वाहतूक विभागास देण्यात याव्यात, अशी मागणी बाळा नर यांनी केली आहे.