वरळी हिट अ‍ॅण्ड रनमधील आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, शिवसेनेची आग्रही मागणी

वरळी येथे एका श्रीमंत बापाच्या मुलाने बीएमडब्ल्यू कार वेगाने चालवून दुचाकीला धडक दिल्याने वरळी कोळीवाडा येथील रहिवासी असलेल्या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी शिवसेनेने विधिमंडळ अधिवेशनात केली.

शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी हा मुद्दा विधान परिषदेत मांडली. घटना घडली तेव्हा कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता असे तिथे उपस्थित नागरिकांनी सांगितले. महिला कारच्या एका टायरमध्ये अडकल्याचे पाहूनही त्याने कार चालवून तिला फरफटत नेले. मद्यपान करून गाडी चालवल्याचा दावा फॉरेन्सिक अहवालात मात्र फेटाळून लावण्यात आला हे धक्कादायक आहे, असे आमदार शिंदे यांनी सांगितले.

हा अत्यंत गंभीर प्रकार असून या प्रकरणाचा खटला अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वरळीकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आरोपीकडून साक्षी, पुराव्यात छेडछाड करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात यावी, अशीही मागणी शिंदे यांनी लावून धरली.