गणेशोत्सवाच्या दोन महिने आधीच गणेशमूर्ती बनवण्यासाठी कलाकार सुरुवात करतात, मात्र त्यानंतर काही दिवसांनी महापालिका प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालतात. त्यामुळे मूर्तिकारांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे पर्यावरण जपण्याबरोबर मूर्तिकारांचे नुकसान होऊ नये यासाठी गणेश मूर्तिकारांना मोफत शाडू माती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांनी मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिकेकडे केली आहे.
गणेशोत्सव काळात मुंबईत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे पर्यावरणाचे प्रदूषण टाळण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून मूर्तिकारांनी शाडू मातीच्या मूर्ती बनवाव्यात, असे आवाहन केले जाते. मात्र, शाडूची माती महाग मिळते. मूर्तिकारांना शाडूची माती विकत घेण्यासाठी कोणतीही सवलत दिली जात नाही, प्रोत्साहनात्मक उपाय केले जात नाहीत. त्यामुळे मूर्तिकार नाइलाजाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती घडवतात.
मंडळे, मूर्तिकारांच्या समन्वयाने नियम बनवा!
गणेशोत्सव साजरा करताना मूर्तिकारांचे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी मंडळे आणि मूर्तिकारांच्या समन्वयाने नियम बनवले गेले पाहिजे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिका पर्यावरण रक्षणासाठी जाहिरातींवर कोटय़वधी रुपये खर्च करतात. गणेशोत्सवाच्या काळात मूर्तिकारांना शाडूची माती मोफत उपलब्ध करून दिल्यास त्यामुळे पर्यावरण रक्षण आणि संवर्धनालाही मोठा हातभार लागेल. मूर्तिकार आणि गणेशभक्तांनाही सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणाला मदत केल्याचे समाधान वाटेल आणि त्यांचा उत्साह वाढेल. त्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने गणेशमूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकारांना मोफत शाडूची माती उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.