खासगी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या नावाखाली एसटी महामंडळाकडून सरकारला लुटण्याचा प्रयत्न होत असून यासाठी केलेल्या कंत्राटामध्ये 2 हजार 800 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केला. ही कंत्राटे रद्द करून चौकशी करण्याचे अधिकृत आदेश सरकारने जारी करावेत, अशी मागणी दानवे यांनी केली.
शिवालय येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या घोटाळय़ासंदर्भात माहिती दिली. गुजरातमधील मे. ट्रव्हल टाइम प्रा. लि., केरळमधील मे. अँथोनी रोड ट्रान्सपोर्ट सोल्युशन प्रा. लि. आणि दिल्लीतील मे. सिटी लाइफलाइन ट्रव्हल्स प्रा. लि. या तीन कंपन्यांना एसटी महामंडळाने 1310 खासगी बसेस भाडेतत्त्वावर पुरवण्याची कंत्राटे वाढीव दराने दिली आहेत. त्यामुळे 2800 कोटी रुपयांचा भुर्दंड सरकारला बसणार आहे, असे दानवे म्हणाले.
या कंत्राटाच्या तांत्रिक पात्रता निविदा निवडणूक आचारसंहिता घोषित होण्याच्या काही मिनिटे अगोदर उघडण्यात आल्या होत्या तर वित्तीय निविदा हिवाळी अधिवेशनाच्या काळात उघडण्यात आल्या, असे दानवे यांनी सांगितले.
- सरकारने एसटी महामंडळाच्या या निर्णयाला स्थगिती दिल्याचे सांगितले जाते, परंतु अधिकृत कोणतेही आदेश काढले गेले नाहीत. ते तातडीने काढावेत आणि या कंत्राटाची चौकशी केली जावी, अशी मागणी दानवे यांनी यावेळी केली.
- सांगली विभागात राजमुद्रा कंपनीमार्फत अशा 100 बसेस कार्यरत आहेत. त्यांना डिझेलसह दर किलोमीटरला 44.38 रुपये दिले जात आहेत. वरील तीन कंपन्यांना मात्र किलोमीटरला 63 रुपये दिले जात आहेत. म्हणजे प्रति किलोमीटर 19 रुपये जास्त दिले जाणार आहेत. त्यामुळे दरवर्षी 280 कोटींचा भुर्दंड पडणार असून दहा वर्षांचे कंत्राट दिल्यास 2800 कोटी रुपयांचा फटका राज्याला बसणार आहे, असे दानवे यांनी सांगितले.