![arvind sawant](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/12/arvind-sawant-696x447.jpg)
येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांची जयंती आहे. त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे मुख्यालयासमोर महाराजांचा पुतळा उभारा, अशी आग्रही मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आज संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केली.
मुंबईत व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून एक रेल्वे स्टेशन होते. त्याला बोरीबंदरही म्हटले जायचे. त्या रेल्वेस्थानकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत रेल्वे मुख्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा अशी शिवसेनेची मागणी आहे, असे अरविंद सावंत यांनी ठणकावून सांगितले. या देशात हिंदवी स्वराज्य असे जर पुणाच्या मुखातून आले असेल तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी स्वराज्याचे निर्माण केले. त्या स्वराज्यात जातपात, धर्म, पंथ नव्हते. त्यांनी डोंगरावरही आणि समुद्रातही किल्ले बनवले. दोन्ही ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध होते, अशा दूरदर्शी राजाने अनेक किल्ले निर्माण केले, असे ते म्हणाले.