भूमिपूजन होऊन पाच वर्षे झाली तरी गोवंडी ‘शताब्दी’चे नूतनीकरण रखडले, काम तातडीने सुरू करण्याची; शिवसेनेची मागणी

पूर्व उपनगरातील गोरगरीब रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे गोवंडी शताब्दी रुग्णालय (पंडित मदनमोहन मालवीय हॉस्पिटल) नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करून पाच वर्षे उलटली तरी अजूनही या रुग्णालयाच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रुग्णायलयाचे नूतनीकरण तातडीने सुरू करावे अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी सार्वजनिक आरोग्य उपायुक्त संजय कुऱहाडे यांच्याकडे केली आहे.

गोवंडी शताब्दी रुग्णालय हे पूर्व उपनगरातील शेकडो गोरगरीब रुग्णांसाठी नेहमीच आधार ठरले आहे. शिवसेनेच्या मागणीनुसार पालिकेच्या माध्यमातून या रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये तब्बल 580 खाटांची व्यवस्था रुग्णालयात होणार होती. या रुग्णालयाच्या कामाची सुरुवात तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यातही आली. या कामाला तब्बल तीन वेळा पंत्राटदाराला मुदत वाढवून देण्यात आली. मात्र याला पाच वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्याप कामाची सुरुवात झालेली नाही. नूतनीकरण रखडल्याने चेंबूर, शिवाजीनगर, मानखुर्द या तालुक्यांमधील रुग्णांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रुग्णालयाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी पाटणकर यांनी केली आहे. दरम्यान, विभागात गेल्या तीन वर्षांपासून पायाभूत सुविधांची वानवा असल्यामुळे तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदनही ‘बेस्ट’चे माजी अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांना दिले आहे.