शिवडीत रस्त्यांची निकृष्टे कामे सहन केली जाणार नाहीत! कंत्राटदार कंपनीवर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

शिवडी विभागातील शिवडी स्टेशन रोड तसेच टी. जे. रोडच्या काँक्रीटीकरणाची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची करण्यात आली असून त्यामुळे सर्वसामान्य रहिवाशांसह वाहनचालकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. भविष्यात अशा निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे अपघात होऊ शकतो. शिवडीत रस्त्यांची निकृष्ट कामे सहन केली जाणार नाहीत. अशी कामचलाऊ कामे करून लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या कंत्राटदार कंपनीवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी शिवडीचे शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी महापालिका अधिकाऱ्यांकडे केली आहे.

शिवडी विधानसभेचे शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी एफ-दक्षिण विभागात सुरू असलेल्या एकूण सात रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामाची महापालिका अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त पाहणी केली. यावेळी प्रभाग क्रमांक 206 मधील शिवडी स्टेशन रोड तसेच टी. जे. रोडची पाहणी करत असताना संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केलेले आढळले. यावर या निकृष्ट कामाला जबाबदार असणाऱ्या एनसीसी कंपनीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी चौधरी यांनी महापालिका अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी माजी नगरसेवक सचिन पडवळ, शाखाप्रमुख बैजू हिंदोळे, महिला शाखा संघटक शुभदा पाटील, मुंबई महापालिका पायाभूत सुविधा विभागाचे उपायुक्त भोरे, रोड विभाग सहाय्यक अभियंता परळकर, दुय्यम अभियंता मुंडे आणि चौधरी यांच्यासह स्थानिक उपस्थित होते. दरम्यान, जर हे निकृष्ट रोड वेळीच सुधारले नाही तर स्थानिकांसह शिवसेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा आमदार अजय चौधरी यांनी दिला.