असे साकारतेय शिवसेनाप्रमुखांचे राष्ट्रीय स्मारक

दादर शिवाजी पार्क येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जागतिक दर्जाचे राष्ट्रीय स्मारक साकारत आहे. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून त्याची घोषणा करताना आज एमएमआरडीएने आकर्षक आणि दिमाखदार फोटो जारी केले आहेत…

कलाकार दालन, संग्रहालय, ग्रंथालय, भूमिगत वाहनतळ

एक इंटरप्रिटेशन सेंटरदेखील बांधण्यात आले आहे, ज्याचे क्षेत्रफळ अंदाजे 1530.44 चौ. मी. आहे. हे सेंटर भूमिगत स्वरूपात असून तळघरात कलाकार दालन, संग्रहालय, ग्रंथालय या दालनांचा तसेच प्रसाधनगृह आणि देखभाल कक्ष यांचा समावेश आहे. प्रवेशद्वार इमारतीचे क्षेत्रफळ अंदाजे 3099.84 चौ. मी. आहे, ज्यात बहुउद्देशीय सभागृह, सुरक्षा नियंत्रण कक्ष, भूमिगत वाहनतळ (27 वाहने) आणि वाहनांसाठी दोन स्वतंत्र उद्वाहकांचा समावेश आहे.

अध्यक्ष, सचिव यांची कार्यालये

प्रशासकीय इमारत 639.70 चौ. मी. क्षेत्रफळाची असून यामध्ये उपहारगृह, कलाकार दालन कक्ष, प्रसाधनगृह आणि न्यासाचे अध्यक्ष व सचिव कार्यालये यांचा समावेश आहे. इमारतीचे छत आधुनिक मंगलौरी कौल पद्धतीने बांधण्यात आले आहे.

भविष्यकाळातील तंत्रज्ञानाचा वापर करून महापौर निवासस्थान इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटाचे प्रदर्शन करणारी विविध छायाचित्रे, दृष्यचित्रे आणि त्यांचा राजकीय प्रवास दर्शवणारी माहिती प्रदर्शित केली जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात प्राधिकरणाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत तंत्रज्ञानाशी संबंधित विविध सेवांचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये हार्डवेअर आणि साहाय्यभूत सेवा, लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्च्युअल रियालिटी, ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटक यांचा समावेश असेल.