गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उपक्रमातील गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या चाचण्या सुरू होण्यास अजून महिनाभराचा कालावधी लागणार आहे. या चाचण्या करण्यासाठी पुढील आठवडय़ात निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यानंतर सर्व प्रक्रिया होईपर्यंत महिना ते दीड महिन्याचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेकडो गोरगरीबांना अजून काही दिवस खासगी लॅबमध्येच चाचण्या कराव्या लागणार असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
मुंबईच्या झोपडपट्टी भागातील गोरगरीबांना घरापासून केवळ दहा मिनिटांच्या अंतरावर दर्जेदार आणि मोफत उपचार मिळावेत यासाठी पालिकेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य पेंद्र उपक्रम सुरू केला आहे. मुंबईत 17 नोव्हेंबर 2022 रोजी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रमा’ची सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी रुग्णांना दंत चिकित्सा, स्त्राrरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ञांकडून अशा विविध तज्ञांच्या उपचार, महानगरपालिका दरात एक्स रे, सोनोग्राफी, ईसीजी, सिटी स्कॅन, एमआरआय, मॅमोग्राफी सुविधा आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र महिनाभरापूर्वी कंत्राटदाराचे कंत्राट संपल्याने या चाचण्या बंद आहेत. पालिकेने कंत्राटासाठी वेळेत निविदा प्रक्रिया राबवली नसल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे.
147 चाचण्या मिळतात मोफत
‘आपला दवाखाना’ उपक्रमात पालिकेकडून खासगी आणि नामांकित प्रयोगशाळांशी करार करून विविध प्रकारच्या 147 चाचण्या मोफत केल्या जात आहेत. ही आरोग्य केंद्रे रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असल्यामुळे कामावरून उशिरा घरी येणाऱया सर्वसामान्यांनाही मोठा फायदा होतो. सद्यस्थितीत मुंबई शहर आणि उपनगरातील सुमारे 250 ठिकाणी ही सुविधा सुरू आहे.
पालिका म्हणते पर्यायी व्यवस्था केलीय
‘आपला दवाखाना’मध्ये चाचण्यांसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराची मुदत संपली असली तरी या ठिकाणी सॅम्पल घेण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात आली आहे. या सॅम्पलच्या चाचण्या पालिकेची उपनगरीय रुग्णालये, दवाखान्यांमधील लॅबमध्ये ‘आपली चिकित्सा’ उपक्रमांतर्गत सुरू आहेत. मात्र प्रत्यक्षात हे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.
अशी आहे सुविधा
सध्या कार्यरत असलेल्या आपला दवाखान्यांमध्ये पोर्टाकेबिन्समध्ये 85, सुसज्ज इमारतीत 17, नियमित दवाखाने 108 आणि पॉलिक्लिनिक्स 33 याप्रमाणे दवाखाने कार्यरत आहेत. आरोग्य सुविधांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने झोपडीबहुल भागातील प्रत्येक 25 हजार लोकसंख्येसाठी एक दवाखाना तर अडीच लाख लोकसंख्येसाठी एक पॉलिक्लिनिक अशा पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दोन सत्रांमध्ये दवाखान्याची सेवा रूग्णांसाठी उपलब्ध असून या दवाखान्यांच्या ठिकाणी सेवा पुरविण्यासाठी 1 हजार 140 कर्मचारी कार्यरत आहेत.