मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक, अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब उद्या विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना तसेच महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अनिल परब हे उद्या दुपारी 12 वाजता कोकण विभागीय आयुक्तांकडे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई, अमोल कीर्तिकर, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सुमारे तीन हजार शिवसैनिक, युवासैनिक तसेच पदवीधर मतदार उपस्थित राहणार आहेत. 2004 तसेच 2012 आणि 2018 असे तीन वेळा अनिल परब हे विधान परिषदेचे शिवसेना आमदार राहिलेले आहेत. यावेळी प्रथमच ते मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. या मतदारसंघात शिवसैनिकांनी मोठय़ा संख्येने मतदार नोंदणी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात यावेळी 1 लाख 16 हजार 923 मतदार आहेत. ‘गेली तीस वर्षे मुंबई पदवीधर मतदारसंघ शिवसेनेकडे राहिलेला आहे. मतदार नोंदणी, प्रचार यामध्ये शिवसेनेने आघाडी घेतली आहे. यावेळीसुद्धा शिवसेनेचाच विजय निश्चित आहे,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तयारी मतमोजणीची…

मुंबईत 20 मे रोजी झालेल्या मतदानानंतर ईव्हीएम सुरक्षितरीत्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या असून तिथे पोलिसांचा 24 तास पहारा ठेवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, 4 जूनला होणार आहे. दक्षिण आणि दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन्स शिवडी येथील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या असून तिथे पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे.