
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी उल्हासनगरमध्ये पार पडलेल्या मेळाव्यात केला. या मेळाव्याला उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केल्याने सर्व परिसर दणाणून गेला.
ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रुपरेखा आखण्यासाठी उल्हासनगरमध्ये शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे आणि महिला जिल्हा संघटक अंजली राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या मेळाव्याला उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, भीमसेन मोरे, कल्याण जिल्हा युवाधिकारी भाऊ म्हात्रे, शहरप्रमुख कैलास तेजी, कुलविंदर सिंग (बिंदर) बैस, महानगरप्रमुख राधाचरण करोतीया, अॅड. महेश फुंदे, जया तेजी, विधानसभा संघटक मंगला पाटील, उपशहरप्रमुख शेखर यादव, राजू माने, शिवाजी जावळे, सुरेश पाटील, कृष्णा पुजारी, भगवान मोहिते, राजन वेलकर आदी उपस्थित होते.
भाजप डरपोक पक्ष
सरकारने निवडणुका न घेता लोकशाहीची गळचेपी केली आहे. त्यामुळे भाजप आणि मिंधे गटाच्या विरोधात जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा संताप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाच्या रूपाने बाहेर पडणार आहे. त्यामुळे सत्ताधारी निवडणुका लांबणीवर टाकण्याचा खटाटोप करीत आहेत. भाजप हा डरपोक पक्ष आहे. या निवडणुकांमध्ये फटका बसण्याच्या भीतीने त्या लांबणीवर टाकल्या जात आहेत, असा घणघात जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी यावेळी केला