महिलांच्या पेपे जीन्सच्या अश्लील जाहिरातींविरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांची 19 वर्षांनंतर निर्दोष सुटका झाली. वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आंदोलनाच्या खटल्यात सबळ पुराव्यांअभावी शिवसैनिकांना निर्दोष मुक्त केले. 19 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढय़ात दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या या निकालाने शिवसैनिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
2005 मध्ये महिलांच्या पेपे जीन्सच्या अश्लील जाहिरातींविरोधात वांद्रे पश्चिम विधानसभेतील शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी वांद्रे पोलिसांनी तत्कालीन शाखाप्रमुख प्रमोद महाडिक, उपविभागप्रमुख तथा ग्राहक संरक्षण कक्षाचे सरचिटणीस विजय मालणकर, महिला विभाग संघटक रजनी मेस्त्राr, महिला शाखा संघटक मनीषा फोंडे, प्रियांका सावंत, राजश्री पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. याचा खटला वांद्रे पूर्व येथील 12वे महानगर दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश के. सी. राजपूत यांच्यापुढे चालला. तब्बल 19 वर्षे या खटल्याच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर अखेर आज न्यायालयाने सहाही शिवसैनिकांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. जमीर खान यांनी शिवसैनिकांची बाजू मांडली, तर अॅड. मेराज शेख यांनी खटल्यादरम्यान मोलाचे सहकार्य केले.