‘त्या’ गुंडांना अटक करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, शिवसैनिकांचा पोलिसांना इशारा

नगर शहरातील हॉटेल यश पॅलेसच्या व्यवस्थापकावरील हल्ल्यानंतर शहरात पुन्हा दगडफेकीच्या घटना वाढत आहेत. या घटनेमुळे शहरातील शांतता भंग झाली आहे. या घटनेतील गुन्हेगारांना तात्काळ अटक न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करू. तसेच पोलिसांनीही दडपशाही केली तर त्यांच्याविरोधातही उपोषण करू, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड, योगीराज गाडे यांनी इशारा दिला आहे.

यावेळी उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, नगर तालुक्याचे बाळासाहेब हराळ, संपत मस्के शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, युवा सेनेचे शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर, दिलीप पवार, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अमोल येवले, संग्राम कोतकर दत्ता जाधव, रामदास भोर, योगीराज गाडे, पप्पू भाले आदी उपस्थित होते.

हॉटेल व्यवस्थापकावर हल्ल्यानंतर कोलकर बंधुंनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक, या घटनेशी आपला काहीही संबंध नसताना खोटे आरोप करण्यात आला आहे. स्वतःची काळी कृत्ये झाकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे गाडे म्हणाले.

युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी घडलेली घटना अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे. नगर शहरात सुद्धा केडगाव या ठिकाणी हत्याकांड झाले होते, त्याचा खटला सुरू आहे. या प्रकरणांमध्ये अनेकांना जामीन सुद्धा मिळालेले आहेत तर, काही आरोपी अद्यापही फरार आहेत. अद्याप पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. पोलिसांनी या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. सत्तेचा माज करत गुन्हे दाखल केले जात आहेत. उद्या आमचीही सत्ता येईल. त्यामुळे यांनी सावध रहावे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. अन्यथा आम्ही पोलीस ठाण्यामध्येच उपोषण करू, असे राठोड म्हणाले.