शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना आक्रमक, अमरावतीमध्ये शिवसैनिकांचे तीव्र आंदोलन; रस्ता रोखला… महायुतीच्या पुतळय़ाचे दहन

सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली जाईल, असे आश्वासन महायुतीने निवडणुकीपूर्वी दिले होते. त्याची पूर्तता न करता आता शेतकऱ्यांना कर्जाचे पैसे भरण्यासाठी सरकारकडून अल्टिमेटम दिला जात आहे. याविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून आज अमरावतीमध्ये शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन करत महायुती सरकारचा निषेध नोंदवला.

अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये शिवसैनिकांनी आज रास्ता रोको करत महायुती सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे… शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणाऱ्या महायुती सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमला. यावेळी महायुती सरकारच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहनही करण्यात आले.

शिवसेना जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मनोज कडू, नरेंद्र पडोळे, प्रदीप बाजड उपजिल्हाप्रमुख राजेश बंड, प्रफुल भोजने, याहया खान पठाण, डॉ. नरेंद्र निर्मळ, विलास माहुरे यांच्यासह अमरावती मधील सर्व तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक तसेच शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

फडणवीस, अजितदादांना अमरावतीत पाय ठेवू देणार नाही

देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा चालवली आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते, पण अजूनही कर्जमाफी दिलेली नाही. दुसरीकडे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांना कर्जाचे पैसे भरायला सांगत आहेत. तिसरीकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांचा वारंवार अवमान करतात. या महायुती सरकारचा करावा तेवढा निषेध कमीच आहे, असा संताप शिवसैनिकांनी यावेळी व्यक्त केला. आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादांना अमरावतीमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.