विधानसभा निवडणुकीच्या आदल्याच दिवशी विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनाच कोटय़वधी रुपये वाटताना ‘बविआ’ने रंगेहाथ पकडल्यामुळे प्रचंड गदारोळ झाला असताना आज कलिनातही भाजपकडून पैसे वाटप करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र भाजपचा हा ‘नोट जिहाद’ निष्ठावंत मतदारांनी धुडकावून लावत भाजप कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. तर शास्त्रीनगर म्युनिसिपल स्कूल येथे धुडगूस घालणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी चांगलाच चोप देत पिटाळून लावले.
कलिना विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे संजय पोतनीस सलग दोन वेळा निवडून आले असून या वेळी ते हॅट्ट्रिक करणार असल्याचे स्पष्ट चित्र मतदार संघात दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपचे उमेदवार अमरजित सिंग यांचा पराभव अटळ आहे. मात्र पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्यामुळे भाजपकडून आज मतदानाच्या दिवशी मतदारांना पैशाचे वाटप, धुडगूस घालण्याचे प्रकार करण्यात आले. यामध्ये डिमेलो पंपाऊंड, लसूनवाडी येथे दुपारच्या सुमारास पैशाचे वाटप करणाऱया भाजपच्या कार्यकर्त्यांना स्थानिक नागरिकांनी अक्षरशः पिटाळून लावले. तर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शास्त्रीनगर म्युनिसिपल स्कूल येथे सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास बोगस मतदान करून धुडगूस घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ठिकाणी खुद्द शिवसेनेचे उमेदवार संजय पोतनीस आणि शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांना अक्षरशः हाकलून दिले. या वेळी एसीपी आल्यामुळे गंभीर प्रश्न टळल्याचेही पोतनीस म्हणाले. यानंतर भाजपकडून 50हून जास्त सिक्युरिटी गार्ड आणून दहशत माजवण्याचे कारस्थानही करण्यात आले. तर काही ठिकाणी मतदारांना जबरदस्ती ‘नोटा’चे बटण दाबण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही संजय पोतनीस यांनी केला.