
कर्नाटकातील चित्रदुर्ग येते कन्नड वेदिका रक्षण संघटनेने महाराष्ट्राच्या बसची तोडपोड करीत वाहक व चालकाला काळे फासून मारहाण केली होती. या घटनेचे पडसाद सोलापूरसह महाराष्ट्रात उमटत आहेत. आज दुपारी सात रस्ता परिसरात कर्नाटकातून महाराष्ट्रात आलेल्या बसला शिवसैनिकांनी रोखून धरले. वाहक व चालकाला खाली उतरवून ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत भगवा रंग फासला. तसेच बसच्या काचेवर भगव्या रंगात ‘जय महाराष्ट्र’ लिहिण्यात आले. तसेच यापुढे कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसवर हल्ले झाले तर कर्नाटकची एकही बस महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असा इशारा देत कर्नाटकच्या बसचालकाला ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यास भाग पाडले. या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, युवासेनेचे बालाजी चौगुलेंसह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते.