
दक्षिण मुंबईतील खेतवाडी येथील पुरातन पितळे मंदिर अन्यत्र हलवण्याचा डाव गुरुवारी शिवसेनेने उधळला. बिल्डरच्या फायद्यासाठी मंदिर दुसरीकडे हलवण्याचे कारस्थान रचले गेले होते. याची माहिती मिळताच शिवसैनिकांनी धाव घेऊन रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आणि महायुती सरकारच्या ‘हिंदुद्रोही’ कारस्थानाला झटका देत पितळे मारुती मंदिर अन्यत्र हलवण्याचा खटाटोप रोखला.
खेतवाडी क्रमांक – 8 येथील 150 वर्षे जुने असलेले पितळे मारुती मंदिर वारसा स्थळाच्या ‘श्रेणी 2-ब’मध्ये अंतर्भूत आहे. हे मंदिर पुनर्विकासाच्या नावाखाली पाडून आतील भागात छोट्या आकारात बांधून देण्याचा घाट बिल्डरने घातला आहे. त्याला स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. रहिवाशांच्या विरोधाला न जुमानता बिल्डरच्या मर्जीतील ट्रस्टींनी गुरुवारी सकाळी मंदिर अन्यत्र हलवण्याच्या हेतूने पूजा सुरू केली.
बुधवारी रात्री शिवसैनिकांनी स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या इमारतीबाहेर ‘मंदिर वाचवा’च्या घोषणा दिल्या होत्या. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती. नार्वेकर यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही मंदिर अन्यत्र हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्याने शिवसैनिक संतप्त झाले आणि रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. दक्षिण मुंबई विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनात दक्षिण मुंबई शिवसेना विभाग संघटक युगंधरा साळेकर तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिकांनी सहभाग घेतला. या वेळी पोलिसांनी मध्यस्थी करत मंदिर न हलवण्याची सूचना ट्रस्टींना केली.
बिल्डरची मनमानी खपवून घेणार नाही! आदित्य ठाकरे यांचा इशारा
पितळे मारुती मंदिर पुनर्विकासाच्या नावाखाली पाडण्याचा प्रयत्न होत आहे. याला भाविकांनी, स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे. मात्र विकासाच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरू पाहणारे भाजप सरकार स्थानिकांच्या मताचा, त्यांच्या भावनांचा विचार न करताच आपल्या खोट्या हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटत आहे. आम्ही भाविकांच्या भावनांशी खेळ होऊ देणार नाही. आम्हाला पितळे मंदिर जसे आहे, तसेच हवेय. बिल्डरची मनमानी होऊ देणार नाही, असा खणखणीत इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला.
मंदिर वाचविण्यासाठी रहिवाशी हायकोर्टात
पितळे मारुती मंदिर हे स्वयंभू मंदिर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा विचार करता स्वयंभू मंदिर अन्यत्र हलवता येणार नाही. असे असताना बिल्डरच्या फायद्यासाठी पितळे मारुती मंदिर हलवण्याचा घाट घातला आहे. याविरोधात रहिवाशांनी अॅड. कुशान सोलंकी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.