
मराठी माणसांच्या घरादारावर बुलडोझर चालवण्याची भाषा वापरणारा राज बिल्डर अखेर गुडघ्यावर आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर संघटक ऋतुकांचन रसाळ यांच्या नेतृत्वाखाली सलग सहा दिवस बेमुदत उपोषण केल्याने पालिका, पोलीस यंत्रणा व बिल्डरची अक्षरशः धावाधाव झाली. अधिकाऱ्यांसह राज बिल्डरने आज शिवसेनेच्या तिसगाव येथील शाखेत भेट देत जवळपास ८० टक्के मागण्या मान्य केल्या. त्यात प्रामुख्याने सातबाऱ्यावर घरे, चाळी यांच्या नोंदी करतानाच रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचे मान्य केले आहे. तसेच कोळसेवाडीचे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार व बिल्डरला मदत करणाऱ्या अन्य अधिकाऱ्यांविरोधातील अहवाल वरिष्ठांना सादर करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे राज बिल्डरची मग्रुरी पार उतरली आहे.
कल्याण पूर्वेतील जिम्मी बाग आणि कर्पेवाडी परिसरातील हजारो स्थानिक मराठी रहिवाशांवर राज बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपरचे मालक राज चतुर्वेदी आणि महानगरपालिकेचे तत्कालीन अधिकारी तसेच पोलिसांच्या संगनमताने मोठा अन्याय केला आहे. त्यामुळे रहिवाशांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर संघटक ऋतुकांचन रसाळ यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पूर्वेतील तिसगाव शाखेत बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. त्यामुळे हादरलेल्या प्रशासनाची चांगलीच तंतरली. राज डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डरचे मालक राज चतुर्वेदी यांनी पालिका व पोलीस अधिकाऱ्यांसह उपोषणस्थळी भेट देत रहिवाशांना विश्वासात घेऊनच भविष्यात काम केले जाईल असे आश्वासन दिले.
कल्याण जिल्हा संपर्कप्रमुख-माजी महापौर रमेश जाधव, कल्याण जिल्हा संघटक, माजी उपमहापौर तात्यासाहेब माने, भिवंडी लोकसभा संपर्क संघटक आशा रसाळ, ग्राहक संरक्षण जिल्हा प्रसारक प्रमोद कांबळे, ग्राहक कक्ष उपजिल्हा संघटक नीलेश देसले, उपशहरप्रमुख नितीन मोकल, उपविभागप्रमुख रमेश तिखे, गणेश साळवे, अशोक बोयतकर तसेच रहिवासी यावेळी उपस्थित होते.
या मागण्या केल्या मान्य
सातबाऱ्यावर घरे, चाळी यांच्या नोंदी करतानाच रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचे मान्य केले. कोळसेवाडीचे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार, पालिकेचे सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, सविता हिले यांच्यावरील कारवाई करण्यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांना देण्यात येईल. तसेच नगररचना विभागाने क्लस्टर योजनेची कोणतीही परवानगी राज बिल्डर्सला दिली नसल्याचे पत्र रहिवाशांना देण्यात आले. त्यानंतर ऋतुकांचन रसाळ, ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब हरदास यांनी उपोषण स्थगित केले. भविष्यात रहिवाशांविरोधात कोणतेही चुकीचे पाऊल उचलण्याचे प्रयत्न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, असा इशाराही रसाळ यांनी यावेळी दिला.