छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथे आज भव्य शिवजयंती सोहळा, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहणार

मुंबई आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा परिसर उद्या शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमणार आहे. भारतीय कामगार सेनेच्या वतीने यंदाही विलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर विमानतळ परिसरात असणाऱ्या शिवरायांच्या पुतळय़ाजवळ शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे. या उत्सवाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळावरील शिवजन्मोत्सव सोहळ्याला एक वेगळेच महत्त्व आहे. भारतीय कामगार सेनेच्या वतीने दरवर्षी हा शिवजयंती उत्सव आयोजित केला जातो. यावेळी वातावरण भगवेमय होऊन जाते. शिवजन्म आणि शिवकाल अवतरलाय असे वाटते. ढोलताशांचा गजर आणि बॅण्ड पथकांमुळे उत्साह द्विगुणित होतो. शिवकालिन मर्दांनी खेळांची प्रात्यक्षिके वातावरण अधिकच भारावून टाकतात.

याप्रसंगी शिवसेना नेते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत आणि आमदार अॅड. अनिल परब, उपनेते सचिन अहिर, अजित साळवी यांच्यासह भारतीय कामगार सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत, अशी माहिती भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांनी दिली.