सातासमुद्रापार सिडनीत शिवजयंती उत्साहात

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत आणि ढोल-ताशांच्या गजरात सातासमुद्रापार ऑस्ट्रेलियातदेखील शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असतानाच, सिडनी शहरातही यानिमित्ताने शिवगर्जना घुमली आणि शिवभक्तीचा जागर करण्यात आला.

ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या मराठी बांधवांच्या ‘सह्याद्री सिडनी’ या परिवाराच्या संकल्पनेतून गेल्या बारा वर्षांपासून सिडनी शहरामध्ये शिवजयंती साजरी केली जाते. यंदाचे शिवजयंतीचे १३ वे वर्ष होते. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि विचारांचा वारसा सातासमुद्रापार परदेशी लोकमानसात पोहोचवण्याचे कार्य होत आहे.

यंदादेखील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. तसेच मराठी संस्कृतीचे महत्त्व पटवून देणारी मराठमोळी शोभायात्रा यामुळे शिवजयंती सोहळ्याला खऱ्या अर्थाने शोभा आली. यानंतर शिवप्रतिमेचे पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

घरापासून परदेशात स्थिरावलेल्या मराठी भाषिक युवकांनी सहकुटुंब या शिवजयंती सोहळ्यात सहभागी होऊन शिवाजी महाराजांचे विचार जपण्याचे कार्य केले. गेल्या एक ते दोन वर्षांपासून आम्ही सिडनीमध्ये सह्याद्री सिडनी परिवाराच्या माध्यमातून मराठी संस्कृती जपण्याचे काम करीत आहोत. अनेक सण, उत्सव साजरे करीत असतो. त्यात मातीपासून लांब असलो तरी आमची मूळ मराठी मातीशी नाळ घट्ट रुजवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीचे आयोजन करणे आमच्यासाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. या सोहळ्यामुळे आम्हाला वर्षभर ऊर्जा मिळते, अशा भावना ‘सह्याद्री सिडनी’ परिवाराच्या संयोजकांनी व्यक्त केल्या