शीव रुग्णालयाची दुरवस्था, एक लाख आयव्ही फ्युईड बाटल्यांसाठी डोनेशन घेण्याची वेळ

शीव रुग्णालयातील औषध व साहित्य खेरदीची टेंडर प्रक्रिया रखडल्याने रुग्णालयावर तब्बल एक लाख ‘आयव्ही फ्लुईड’ बाटल्या डोनेशनच्या माध्यमातून घेण्याची वेळ आली. टेंडर प्रक्रिया रखडल्याने औषधे व उपकरणांची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंटवर (सीपीडी) कारवाई करण्याची मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत केली.

रुग्णालयाशी संबंधित लक्षवेधीवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी पालिकेच्या रुग्णालयाच्या कारभाराची पोलखोल केली. दोन वर्षे नगरसेवक नसल्याने पालिका रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. कामाची पंत्राटे दिली जात आहेत का? पुढे त्यांचे काय होते? त्यामुळे ही परिस्थिती बिकट होत चालली आहे. पण काही प्रशासकीय गडबड झाली तर दुर्दैवाने डीन किंवा डॉक्टरकडे बोट दाखवले जाते. पण त्यांच्याकडे बोट दाखवू नये. कारण त्यांच्यावर तरी किती प्रशासकीय बोजा टाकणार?
शीव रुग्णालयाच्या दुरवस्थेवर भाष्य करताना ते म्हणाले की, शीव रुग्णालयावर मागील वर्षी एक लाख आयव्ही फ्लुईडच्या बाटल्या डोनेशनमधून घेण्याची वेळ आली होती. मागील वर्षी मेडिकल ऑक्सिजनचे टेंडर संपले होते. त्याचे नूतनीकरण करणे अद्याप शिल्लक आहे. एक्स रे फिल्मचा साठाही कमी आहे. ऑक्सिजनचे टेंडर काढले नाही आणि काढले असेल तर त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. डॉक्टर्सचे प्रमोशन एक वर्षापासून थांबले आहे. डॉक्टरांचे प्रमोशन थांबल्यावर सर्वांचेच थांबते. सायन रुग्णालयाप्रमाणे नायर रुग्णालयात मध्यंतरी वसतीगृहात आग लागली होती. त्यानंतर कळले की, अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेतले नव्हते. ती इमारत वापरातच आणलेली नव्हती. होस्टलेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या आधी केले होते याकडे त्यांनी सभागहाचे लक्ष वेधले.

औषधे आणि साहित्याच्या कमतरतेवर बोलताना ते म्हणाले की, वर्षात सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंट (सीपीडी)मार्फत औषधांची खरेदी होते. पण गेल्या दोन वर्षांत किती औषधांचे शेडय़ूल ( औषधे व सामुग्री) खरेदी झाले आहेत? किती शेडय़ूल रुग्णालयापर्यंत पोहोचवले आहेत? म्हणजे एक्स रे मशीन, सिटी स्पॅन मशीन, एक्स रे फिल्म, औषधे आयव्ही फ्लुईडच्या संद्रभात ‘सीपीडी’मुळे हा त्रास सुरू झाला आहे. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. डीन डॉक्टर्सना विश्वासात घेऊन पुढे काम नेले पाहिजे असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

पंधरा दिवसांत टेंडर प्रक्रिया पूर्ण

या प्रश्नाला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. एक लाख आयव्ही फ्लुईड डोनेशनमधून घेण्यात आल्याचे त्यांनी मान्य केले. तांत्रिक अडचणींमुळे डेंटर वेळेवर निघू शकले नाही. टेंडरला दोन महिने विलंब झाला. त्यामुळे आयव्ही फ्लुईड डोनेशनच्या माध्यमातून घ्याव्या लागल्या. तीन महिने अगोदरच हे टेंडर संपले आहे. पण टेंडर संपले असल्याने औषधांचा पुरवठा वेळेवर करता यावा म्हणून त्याच दरात टेंडर तीन महिने पुढे सुरू ठेवले आहे त्यांचे टेंडर देखील झाले आहे. त्याची कागदपत्रे पूर्ण झाली आहेत. येत्या पंधरा दिवसांत या टेंडरची प्रक्रिया पूर्ण होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.