शीव उड्डाणपूल बंद…, दहा मिनिटांच्या प्रवासासाठी होतेय पाऊण तास रखडपट्टी!

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा शीव उड्डाणपूल बुधवारी मध्यरात्रीपासून बंद झाल्यानंतर पहिल्याच दिवशी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.  या मार्गावरील वाहतूक आता धारावीतून वळविण्यात आली आहे. यामुळे एलबीएस मार्गावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग गाठण्यासाठी आणि घाटकोपरहून डॉ. आंबेडकर मार्गावरून शीव येथे येण्यासाठी वाहनचालकांची अर्धा ते पाऊण तास रखडपट्टी होत आहे.

पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा शीव रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल बुधकारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आहे. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या तब्बल 23 बेस्ट बस मार्ग प्रभावित झाल्याने दादर आणि शीव परिसरातील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. हा पूल बंद केल्याने या मार्गावरील वाहतूक धारावीतील 60 फूट आणि 90 फूट रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकर मार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

असा बसतोय फटका

माटुंगा लेबर कॅम्पमध्ये रस्ता अरुंद आहे. त्यामुळे शीव रुग्णालयाच्या बस थांब्यापर्यंत हा संपूर्ण रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. z कल्पना सिनेमासमोर रस्त्याच्या मधोमध हाती घेण्यात आलेल्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे येथे पंधरा मिनिटे कोंडी होते. z धारावी टी जंक्शनवर सर्व दिशांनी एकाच ठिकाणी दाखल होणाऱ्या वाहनांमुळे कोंडीचा सामना करावा लागतो.